..आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी दिली 32 कोटींची वैयक्तिक हमी !
पंढरपूर – राज्य सहकारी बँकेसह राष्ट्रीयकृत बँका , व्यापारी , शेतकरी , उस उत्पादक , सभासद , कामगार यांची श्री शंकर सहकारी साखर कारखान्याकडे 262 कोटीची थकबाकी असल्याने कारखाना सुरु करण्यासाठी देशातील कोणतीही बँक कर्ज देवू शकत नाही. परंतु सर्वांचे हित डोळ्यासमोर ठेवून स्वतःच्या वैयक्तिक हमीवर आपण 32 कोटी रुपये उभा केले व आज कारखान्याचा 50 वा गळीत हंगाम सुरु करीत आहोत. या कारखान्याला गतवैभव मिळवून देण्यासाठी सर्वांनी तन , मन , धनाने सहकार्य करावे, असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष रणजितसिंह मोहिते पाटील यांनी केले.
माळशिरस तालुक्यातील सदाशिवनगर येथील श्री शंकर सहकारी साखर कारखान्यात 50 वा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, नंदिनीदेवी मोहिते-पाटील व सहकार महर्षी कारखान्याचे अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. प्रारंभी सहकार महर्षी, आक्कासाहेब व प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रास्ताविक कारखान्याचे उपाध्यक्ष मिलिंद कुलकर्णी यांनी केले.
आ. मोहिते पाटील म्हणाले , डिसेंबर 2018 ला कारखाना ताब्यात आल्यावर जानेवारी 2019 मध्ये डिस्टलरी सुरु केली. कोविडमुळे दोन वर्षे कारखाना सुरु करता आला नाही. गतवर्षी साडेतीन लाख टन उसाचे गाळप झाल्याने 162 कोटीची उलाढाल झाली. राज्य सहकारी बँकेचे 10 कोटी भरले, शेतकर्यांच्या थकीत 32 कोटी एफआरपी पैकी 14 कोटी रुपये परत केले. काही प्रमाणात कामगारांची देणी दिली. परवा 200 रुपयांचा ऊसबिलाचा हप्ता दिला. आता आठ दिवसात आणखी 200 रुपये प्रतिटनाने बिल देणार आहे. यंदा 6 लाख टन उस गाळप करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे 250 कोटीची उलाढाल होइल. कारखाना सुस्थितीत येइल. कारखाना सुरु करण्यासाठी कारखान्याची मालमत्ता गहाण न ठेवता 32 कोटी रुपये माझ्या वैयक्तिक हमीवर उभा केले आहेत. म्हणजे मी कोणावर उपकार केले असे नाही, तर माझी ती जबाबदारी आहे व मी ती पूर्ण करेन.
आमदार राम सातपुते यांनी, राज्य सहकारी बँकेच्या कारभारावर टीका करीत राज्यातील सहकारी साखर कारखाने दिवाळखोरीत काढून ते विकायला काढायचे व आपल्या हितसंबंधी लोकांच्यामार्फत ताब्यात घ्यायचे अशी नीती आता राज्यात सत्तापरिवर्तन झाल्याने चालणार नाही. सहकारी साखर कारखानदारी ही शेतकर्यांची मालकीची राहावी यासाठीच हे सरकार प्रयत्न करेल असे सांगितले.