अवैध मद्य निर्मिती, विक्री व वाहतुकीवर कडक कारवाई करा,राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांचे निर्देश
पंढरपूर :- ज्या गावात अवैध दारु निर्मिती व विक्री होते त्याठिकाणी कडक कारवाई करुन समूळ उच्चाटन करावे. तसेच ज्या ठिकाणाहून अवैध दारुची वाहतुक होते तिथे भरारी पथकाव्दारे तत्काळ कारवाई करावी, असे निर्देश राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी दिले.
शासकीय विश्रामगृह, पंढरपूर येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाची बैठक घेण्यात आली. यावेळी बैठकीत श्री.देसाई यांनी निर्देश दिले. बैठकीला राज्य उत्पादन शुल्कचे विभागीय उपायुक्त ए.बी चासकर, अधीक्षक नितीन धार्मिक, उप-अधिक्षक आदित्य पवार, निरीक्षक पी.ए.मुळे, संदीप कदम यांच्यासह जिल्ह्यातील उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी श्री. देसाई म्हणाले, अवैधरित्या मद्य निर्मिती व विक्रीला आळा घालण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. तसेच अवैध दारु निर्मिती, विक्री करणाऱ्यांवर वचक बसावा या पद्धतीने कार्यप्रणाली आखण्यात यावी. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विविध कार्यप्रणालीमध्ये अत्याधुनिक साधनसामग्रीचा वापर करण्याबाबतही त्यांनी यावेळी सूचना केली.
यावेळी मद्यावरील उत्पादन शुल्क, अनुज्ञप्ती शुल्क, दंड व विशेषाधिकार, क्षेत्रीय संरचना, दारूबंदी कायद्याची नियमावली, मद्य घाऊक विक्री, किरकोळ विक्री, मद्यनिर्मिती, उत्पादन शुल्क आकारण्याची पद्धत, सध्या अस्तित्वात असलेले दर व एमआरपीचे कोष्टक, याबाबत श्री.देसाई यांनी माहिती घेतली.
तसेच पंढरपूर येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मालकीची जागा असून या जागेवर नवीन कार्यालय व कर्मचारी निवासस्थान बांधण्यासाठी तत्काळ प्रस्ताव सादर करावा अशा सूचनाही मंत्री देसाई यांनी यावेळी दिल्या.
यावेळी श्री धार्मिक यांनी जिल्ह्यातील निरिक्षक विभाग, कार्यरत असणारे भरारी पथक, तपासणी नाके, मद्य निर्मिती, वाईन निर्मिती, परवानाधारक दारु विक्री अनुज्ञप्ती, मळी उत्पादन व साठवणूक, मद्य विक्री,महसुलचे वार्षिक उद्दिष्ट व जमा महसूल तसेच दारुबंदी कायद्यातंर्गत दाखल करण्यात आलेले गुन्हे याबाबतची माहिती दिली.