विशेष

आषाढी एकादशीला पावसाच्या साक्षीने निघाला विठुरायाचा रथ सोहळा


पंढरपूर,दि.२६- वारकर्‍यांची प्रचंड गर्दी, भक्तीचा उत्साह व पावसाच्या सरींमध्ये राखी, रखुमाईसह विठुरायाचा रथ सोहळा पार पडला. यावेळी भाविकांनी मोठ्या श्रध्देने या रथाचे दर्शन घेऊन खारीक व बुक्का उधळला.
आषाढी एकादशी दिवशी येथील सरदार खासगीवाले यांच्या वतीने रथ काढण्याची परंपरा आहे. जवळपास अडीचशे वर्षा पासून ही परंपरा सुरू असून सध्या माहेश्‍वरी धर्मशाळेतून हा रथोत्सव निघतो. आषाढी व कार्तिकी एकादशीस लाखो भाविक विठ्ठल रूक्मिणीच्या दर्शनासाठी येतात. परंतु सर्वच भक्तांना एकादशीला देवाचे दर्शन घेता येत नाही. यामुळे देवच आपल्या भक्तांना दर्शन देण्यासाठी राही, रखुमाई सह रथातून नगरप्रदक्षिणा करतो अशी या रथोत्सवा मागे अख्यायिका आहे.
परंपरे प्रमाणे येथील माहेश्‍वरी धर्मशाळेमधून दुपारी एक वाजण्याच्या सुमारास हा रथ देवांना घेऊन निघाला. वीस फूट उंच असलेला हा रथ लाकडी असून तो हाताने ओढत नेला जातो. हा रथ ओढण्याचा मान वडार समाजास आहे. रथामध्ये सजविलेल्या देवांच्या पितळी मूर्ती ठेवण्यात आल्या. यावेळी अनिल महाराज हरिदास, श्रीकांत महाराज हरिदास, शशिकांत हरिदास, सुनील हरिदास, जयंत हरिदास यांनी अभंग गायन व भजन केले. रथावर देवधर, रानडे, जोशी, नातू यांना बसण्याचा मान आहे. तर बडवे मूर्ती जवळ बसतात.
दुपारी एक वाजण्याच्या सुमारास प्रदक्षिणा मार्गावर हा रथ सोहळा निघाला. त्यावेळी रस्त्यावर भाविकांची मोठी गर्दी होती. हे वारकरी रथावर खारीक व बुक्का उधळून मनोभावे दर्शन घेत होते. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पावसाने देखील हजेरी लावली. यंदा वारकर्‍यांची गर्दी जास्त असल्याने रथ पुन्हा माहेश्‍वरी धर्मशाळेत पोहचण्यास अधिकचा वेळ लागला.
अपुरा पोलीस बंदोबस्त
विठुरायाचा रथ काढण्याची जुनी परंपरा आहे. मात्र या उत्सवाला यंदा पोलीस बंदोबस्त तोकडा असल्याचे चित्र होते. वास्तविक यंदा आषाढी एकादशीला मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने प्रदक्षिणा मार्गावर रथ ओढताना मोठी कसरत करावी लागत होती. भाविकांची गर्दी, विक्रेत्यांची दुकाने यामुळे दुर्घटना घडण्याची भीती असते. मात्र माहेश्‍वरी धर्मशाळे मधून रथोत्सवास प्रारंभ झाला तेव्हां येथे एकही पोलीस कर्मचारी उपस्थित नव्हता. पुढे मुख्य चौकात कमी संख्येने पोलीस दिसून आले.

Header
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close