Uncategorized

…कोणता झेंडा घेवू हाती ?
साखरपट्ट्यातील नेते, पदाधिकारी व आमदारांसमोर पेच

प्रशांत आराध्ये
मागील काही वर्षे राष्ट्रवादी काँगे्रस पक्षात धुसफूस सुरूच होती मात्र याचा मोठा अध्याय रविवारी लिहिला गेला. अजित पवार यांनी आपले काका व पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात सरळ भूमिका घेत भाजपाची साथ करण्याचा निर्णय घेतला व जवळपास 35 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला. दरम्यान यामुळे साखरपट्ट्यात कमालीची अस्वस्थता निर्माण झाली असून कोणता झेंडा घेवू हाती.. अशी अवस्था येथील पक्षाचे पदाधिकारी, आमदार तसेच अनेक साखर कारखानदारांची झाली आहे.
अगोदर 2019 ला भल्या सकाळी अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेत शपथविधी उरकला मात्र ते सरकार टिकू शकले नाही. मात्र यंदा दुपारी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेत त्यांनी शिवसेना व भाजपाच्या सरकारला पाठिंबा दिला व सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. यानंतर आता दादांसोबत कोण आणि साहेबांची साथ कोण करणा? याकडे सार्‍यांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादीची ताकद असणार्‍या साखरपट्ट्यात अनेकांची आता कोंडी होत असून आज उघडपणे कोणी बोलायला तयार नाही. सोलापूर जिल्ह्याचा पंढरपूर विभाग असो की सातार्‍याचा भाग तसेच पुणे ग्रामीण येथे या पक्षाची ताकद मोठी आहे.
मागील दोन तीन वर्षाचा विचार केला तर या साखरपट्टयातही साहेब व दादा असे दोन गट दिसत होते. अनेकजण थेट शरद पवारांशी संपर्क करत तर काही अजित पवार यांच्याशी. यानंतरच्या काळात आमदार रोहित पवार यांची सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात एंट्री झाली. त्यांनी सोलापूर शहर असो की पंढरपूर व करमाळा भागात काम वाढविले. रोहित पवार यांना शरद पवार यांचा पाठिंबा असल्याचे उघडपणे दिसत होते. जे ते म्हणतील तेच घडत राहिले. विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांचे नेतृत्व रोहिते पवार यांनीच पुढे आणले होते.
दरम्यान आता अजित पवार हे उपमुख्यमंत्री बनले व त्यांनी भाजपा शिवसेना सरकारमध्ये सामील झाल्यानंतर सार्‍यांचे लक्ष राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यातील पदाधिकार्‍यांची भूमिका काय असणार? याकडे आहे. सध्या काही मोजकी मंडळी सोडली तर सारे मुंबईत घडत असलेल्या घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. भाजपा केंद्रात व राज्यात सत्तेत असल्याने त्यांच्याशी जवळीक साधून मतदारसंघातील कामे करून घेण्यावर राष्ट्रवादीच्या आमदारांचा जोर असून यासाठी बर्‍यापैकी आमदारांचे समर्थन हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना असेल असे दिसत आहे. यातच पक्षाकडून ही कारवाई सुरू होत असल्याने अनेकजण आपली भूमिका गुलदस्त्यातच ठेवण्याच्या मूडमध्ये सध्या दिसत आहेत. निश्‍चित संख्याबळ पुढे आल्यावर ते आपली भूमिका मांडू शकतात. सोलापूर जिल्ह्यात माढा व मोहोळमध्ये राष्ट्रवादीचे बबनराव शिंदे व यशवंत माने हे आमदार आहेत व त्यांची साहेब व दादा या दोघांशी चांगले संबंध आहेत. तर करमाळ्याचे आमदार संजय शिंदे हे अपक्ष असले तरी त्यांना राष्ट्रवादीने पाठिंबा दिला होता.
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपाने बारामतीसह अन्यत्र कोणत्याही स्थितीत विजय मिळविण्याचा चंग बांधला असून यामुळेच या घडामोडी घडत आहेत. अशा स्थितीत आता शरद पवार यांना पुन्हा पक्ष बांधणी करावी लागणार हे निश्‍चित आहे. मुळात मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हे शरद पवार यांना मानणारे आहेत. त्यांची जिद्द व काम पाहता ते सहजासहजी हार मानणार नाहीत व हेच कार्यकर्ते ,पदाधिकारी व आमदारांना माहित असल्याने अनेकजण वेट अ‍ॅण्ड वॉच च्या भूमिकेत राहणार हे निश्‍चित आहे.

Header
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close