राजकिय

आमदार रोहित पवारांची भावनिक पोस्ट, “या घडामोडीबाबत” लहान पोराला सांगाव तरी काय ?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेली फूट, अजित पवार यांनी शरद पवार यांची साथ सोडत पक्षावर सांगितलेला दावा , यानंतर शरद पवार यांनी सुरु केलेले दौरे यामुळे मागील आठवडा खूप गाजला. पवार यांचे नातू कर्जतचए आमदार रोहित पवार हे आजोबांबरोबर दौरे करत होते. पक्षाबरोबर कुटूंबात निर्माण झालेला पेच त्यांना अस्वस्थ करत असून ते घरी परतल्यावर मुलांनी विचारलेल्या प्रश्नांवर त्यांनी ही भावनिक पोस्ट केली आहे. पाहा

सध्याच्या राजकीय वातावरणाच्या पार्श्वभूमीवर ४-५ दिवस घरीच जाता आलं नाही.. काल येवल्याची सभा आटोपून आज घरी आल्यानंतर सकाळी घडलेला प्रसंग तुमच्याशी मुद्दाम शेअर करतोय…
नेहमीप्रमाणे आज सकाळी घरी गेल्या गेल्या मुलं धावतच जवळ आली… मला घट्ट पकडलं… मलाही त्यांच्या त्या स्पर्शाचं समाधान नेहमीपेक्षा अधिकच वाटलं.. त्यांना जवळ घेऊन बोलत असताना मुलाने प्रश्न केला… डॅडा ५ दिवस झालेय कित्ती वाट पाहतोय तुझी.. कुठं गेला होता? (ते दोघंही मला कधी अरेतुरे तर कधी अहोजाहो बोलतात. त्यांच्यासोबतची जवळीक अधिक वाढावी आणि नातं अधिक घट्ट रहावं, म्हणून मलाही तसंच आवडतं.)
त्याच्या प्रश्नावर मी उत्तर दिलं.. बाहेर होतो बाळा….अडचण होती जरा…
‘‘काय अडचण झाली डॅडा?’’ त्याचा पुढचा प्रश्न.
मी – ‘‘आपल्या संघटनेत जरा अडचण आली होती.”
तो – ‘‘काय अडचण आली होती?’’
निरागसपणे एकामागून एक असे अनेक प्रश्न विचारणं त्याचं चालूच होतं.
आता या लहान पोराला सांगावं तरी काय, असा प्रश्न पडला होता. दुसरं काहीतरी बोलून विषय बदलण्याचा प्रयत्न करत होतो. कारण घरी येताना राजकारण घरात घेऊन यायचं नाही आणि बाहेर राजकारण करत असताना मध्ये घर आणायचं नाही, हा माझा मूळ स्वभाव. पण आजचा प्रसंग मात्र माझ्यासाठी अत्यंत वेगळा होता.

मी त्याला म्हणालो, ‘‘अरे बाळा काही नाही, ज्या पक्ष संघटनेत मी काम करतो ना ती संघटना आज अडचणीत आहे. त्यातच संघटना आणि आपल्या कुटुंबात अंतर पडतं की काय असं वाटतंय.. काही आपल्याच जवळची माणसं……
माझ्या तोंडून शब्द फुटत नव्हता. मी गप्प झालो.
तेवढयात तो म्हणाला, बोल ना डॅडा!
त्याच्या बोलण्याने पुन्हा भानावर येत कसंतरी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. त्याच्याशी बोलत असताना मनावर अत्यंत तणाव होता.. बोलताना शब्द जड होत होते.. नेहमीसारखी सहजता नव्हती.. संघटनेतील ज्या गोष्टीमुळं पाच-सहा दिवसांपासून अत्यंत अस्वस्थ होतो, ती गोष्ट काही क्षणापुरती विसरुन मुलांना बोलावं, त्यांनी कसा अभ्यास केला? काय ॲक्टिीव्हिटी केली? हे विचारावं असं वाटंत होतं. पण जणूकाय मूळ विषय माझी पाठ सोडतच नव्हता.

मुलाच्या या प्रश्नांनी मी निरुत्तर होत होतो..… या चिमुकल्या वयात त्याला काय आणि कसं उत्तर द्यावं, असा गोंधळ माझ्या मनात सुरु होता.
तेवढ्यात मुलीने प्रश्न विचारायला सुरवात केली.…
ती म्हणाली…. मग आता काय होईल डॅडा? तू कॉफी घेतली का? असे एका दमात तीने दोन प्रश्न विचारले.
काही नाही बेटा सगळं ठीक होईल. आपल कुटुंब जपणं, सर्वांनी गुण्यागोविंदाने, सामंजस्याने, आनंदाने एकत्र राहणं ही आपली संस्कृती आहे… पण त्याबरोबर आपले विचार जपणं हेही तेवढंच गरजेचं असतं आणि हे विचार जपणारी माणसं आहेत आपल्या सोबत….
तिला माझं हे बोलणं कितपत कळलं की नाही माहीत नाही…
पण तिने होकारार्थी मान हलवली.. आणि माझा हात स्वतःच्या चिमुकल्या हातात घेतला आणि दुसरा हात माझ्या तोंडावरुन फिरवत म्हणाली, ‘‘नो टेंशन डॅडा.. काळजी करु नको.. मॉम, आजोबा, आजी हे आम्ही पण सगळेजण आहोत ना सोबत..’’

तिचे हे शब्द कानावर पडताच मनात विचार आला…
ज्यांना आपण लहान आहेत असं म्हणतो, पण ते खरंच किती मोठे असतात ना… अडचणीच्या काळात जवळची माणसं जेंव्हा आधार बनतात तो आधार खरंच डोंगराएवढा मोठा असतो…
शेवटी कर्तव्याची जाणीव असलेला बाप म्हणून त्या दोघांनाही थोडा वेळ मॉलमध्ये घेऊन गेलो… पण यानिमित्ताने त्यांच्यासोबत घालवलेला वेळ मात्र त्यांच्यापेक्षा मलाच खूप काही देऊन गेला…

Header
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करणे हा IT Act 2000 नुसार गुन्हा आहे.
Close
Close