बदलती राजकीय समीकरणं पंढरपूर मतदारसंघात भाजपाच्या पथ्थ्यावर !
गटबाजीमुळे अगोदरच ताकद क्षीण झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पंढरपूर तालुक्यातील स्थिती पक्ष फुटीनंतर आणखी बिकट होणार निश्चित आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांच्यापासून वेगळे होत पक्षावर दावा सांगितल्यानंतर पंढरपूर तालुक्यातील पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील अनेकांनी अजितदादांच्या गटात जाणे पसंत केले आहे. यामुळे या मतदारसंघात भाजपसाठी वातावरण अनुकूल होताना दिसत आहे.
वास्तविक पाहता पंढरपूर तालुका पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला होता. मात्र मागील दोन वर्षात इथे गटबाजी मोठ्या प्रमाणात झाली आणि अनेक गट तर निर्माण झाले. यातच पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांना ताकद दिल्याने भगीरथ भालके नाराज झाले व त्यांनी बीआरएस पक्षात प्रवेश केला. याचबरोबर पाटील यांनी कल्याणराव काळे यांच्या सहकार शिरोमणी कारखान्यात निवडणूक लावल्याने त्यांचाही राग अभिजीत पाटील यांच्यावर आहे. आता अजित पवार यांनी आपल्या समर्थक आमदारांसह राज्यातील भाजप शिवसेना युतीच्या सरकारला पाठिंबा दिल्यानंतर कल्याणराव काळे यांनी अजितदादांची साथ करण्याचा निर्णय घेतला. तर दुसरीकडे अभिजीत पाटील यांनी मात्र आपली भूमिका स्पष्ट न केल्यामुळे ते शरद पवार यांच्यासोबत आहेत असे निश्चित मानले जात आहे. कारण पाटील यांचा पक्षप्रवेश दोन महिन्यापूर्वीच शरद पवार यांच्या उपस्थितीत पंढरपूर मध्ये झाला होता. आजवर पवार यांनी पाटील यांना दिलेली साथ ,त्यांना दिलेली ताकद, त्याचबरोबर आमदार रोहित पवार यांच्याबरोबर असणारे अभिजीत पाटील यांचे संबंध पाहता ते शरद पवार यांचा गट सोडणार नाहीत हे निश्चित आहे. यामुळेच त्यांनी कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.
गेल्या काही वर्षांपासून पंढरपूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अंतर्गत गटबाजी उफाळून आली आहे. विधानसभा पोटनिवडणूक तसेच कारखान्यांच्या निवडणुकात याचा प्रत्यय आला आहे. यातच आता राष्ट्रवादीत अजित दादा व पवारसाहेब असे दोन गट झाल्याने ज्या त्या नेत्यांनी आपल्या सोयीप्रमाणे नेतृत्व स्वीकारले आहे. अशीच अवस्था मंगळवेढा भागातही असून येथीलही बरेच नेते अजित पवार यांच्या गटात सामील झाले आहेत. तर काही जुन्या जाणत्यांनी मात्र शरद पवार यांची साथ करण्याचा निर्णय घेतला आहे. शरद पवार यांना मानणारा मोठा मतदार मंगळवेढा व पंढरपूर तालुक्यातआहे. मात्र पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात पक्षामध्ये असणारी अगोदर पासूनची धुसफूस व आता निर्माण झालेली नवीन गटबाजी यामुळे पोटनिवडणुकीत येथे काठावर विजयी झालेल्या भाजपला येत्या काळात आपली ताकद आणखीन वाढवून हा मतदारसंघ पुन्हा काबीज करण्याची संधी मिळाली आहे. 2021 मध्ये येथून भाजपचे समाधान आवताडे हे अवघ्या साडेतीन हजार मतांनी विजयी झाले आहेत. परिचारक व आवताडे एकत्र असतानाही त्यांना मोठे मताधिक्य मिळवता आले नाही. यानंतरच्या काळात परिचारक आणि अवताडे यांचेही संबंध फारसे चांगले राहिले नाहीत. मात्र भाजपमध्ये बेशिस्त वर्तन खपवून घेतले जात नसल्याने विधानसभा निवडणुकीत या दोन्ही गटांना पक्षासाठी एकत्र यावे लागणार हे निश्चित आहे. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमधील अजित पवार यांच्यासारखे मातब्बर नेते भाजप शिवसेना युतीबरोबर आल्याने याचा फायदा भाजपच्या उमेदवारांनाही विधानसभा निवडणुकीत होणार आहे. पंढरपूर मतदार संघ हा भाजपकडे असल्याने साहजिकच येथील अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीला भाजपला सहकार्य करावे लागणार आहे. ही भारतीय पक्षाकरता जमेची बाजू असणार आहे.
भगीरथ भालके यांनी कोणत्याही परिस्थितीत येणारी विधानसभा लढवायची यासाठी बी आरएस ची साथ घेतली आहे. अभिजीत पाटील यांची आमदार व्हायची महत्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. यामुळे येणारी निवडणूक ही बहुरंगी व चुरशीची होणार आहे.