सहकार शिरोमणीच्या अध्यक्षपदी कल्याणराव काळे तर उपाध्यक्षपदी भारत कोळेकर
पंढरपूर – सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा कल्याणराव काळे यांची तर उपाध्यक्षपदी भारत कोळेकर यांची निवड करण्यात आली आहे.
अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडी करता संचालक मंडळाची बैठक कारखाना कार्यस्थळावर निवडणूक निर्णय अधिकारी भारत वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी काळे व कोळेकर यांचे एकमेव झाल्याने बिनविरोध निवड घोषित करण्यात आली.
सहकार शिरोमणी कारखान्याची निवडणूक नुकतीच पार पडली असून यंदा ती सोलापूर जिल्ह्यात खूप गाजली. विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी काळे यांच्यासमोर मोठे आव्हान उभे केले होते. ही निवडणूक अत्यंत चुरशीची पार पडली व यात कल्याणराव काळे यांच्या गटाने बाजी मारली. यानंतर आता अध्यक्ष निवडी करता मंगळवारी 11 जुलै रोजी बैठक बोलावण्यात आली होती अध्यक्षपदी कल्याणराव काळे यांची निवड निश्चित मानली जात होती. मात्र उपाध्यक्षपदावर कोणाला संधी दिली जाणार याकडे साऱ्यांचे लक्ष होते. यासाठी नागेश फाटे यांच्यासह अनेकांची नावे चर्चेत होती. मात्र आज सकाळी भारत कोळेकर यांच्या नावावर काळे यांनी शिक्कामोर्तब केले व त्यांना उपाध्यक्षपदी निवडण्यात आले. निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचे सत्कार निवडणूक निर्णय अधिकारी भारत वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले.