पंढरपूर तालुक्यातील दीड लाख नागरिकांना मिळणार मोफत धान्य
पंढरपूर, दि. 17:- राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या माध्यमातून पात्र रेशन कार्डधारकांना वर्षभर मोफत धान्य उपलब्ध होणार आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत तालुक्यातील 1 लाख 52 हजार 727 नागरिकांना जानेवारीपासून मोफत धान्य वितरण केले जात आहे. यासाठी महिन्याला तालुक्यात सुमारे 353 टन गहू व 516 टन तांदूळ असे एकत्रित 869 टन धान्य वाटप करावे लागणार असल्याची माहिती तहसिलदार सु
शील बेल्हेकर यांनी दिली.
पंढरपूर तालुक्यात ग्रामीणमध्ये 116 तर शहरात 30 असे एकूण 146 रेशन दुकान आहेत. अंत्योदय योजनेत 5 हजार 713 कार्डधारक असून 21 हजार 506 लोकसंख्या आहे. तर अन्नसुरक्षा योजनेत 32 हजार 701 कार्डधारक असून 1 लाख 31 हजार 221 लोकसंख्या आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत अंत्योदय कार्डधारकास प्रतीकार्ड 15 किलो गहू 2 रुपये किलो दराने व 20 किलो तांदूळ 3 रुपये किलो दराने अंत्योदय कार्डधारकास दिले जात होते. तसेच अन्नसुरक्षा योजनेत प्रतिव्यक्ती 2 किलो गहू 2 रुपये दराने व 3 किलो तांदूळ 3 रुपये किलो दराने दिले जात होते. जानेवारी 2023 पासून अंत्योद्य योजनेतील प्रत्येक कार्डधारकाला 15 किलो गहू 20 किलो तांदूळ मोफत दिले जाणार आहे. तर अन्नसुरक्षा योजनेत प्रतिव्यक्ती 2 किलो गहू व 3 किलो तांदूळ मोफत दिले जाणार आहे.
तालुक्यातील सर्व रेशन दुकानदारांकडून या योजनेतील नागरिकांना योग्य पध्दतीने वाटप केले जाणार आहे. या योजनेतील कार्डधारकांनी पैसे देऊ नयेत तसेच कोणी पैशाची मागणी केल्यास तत्काळ अन्नधान्य पुरवठा विभागाशी संपर्क साधावा असे, आवाहनही तहसीलदार सुशील बेल्हेकर यांनी केले आहे.