..उघडा डोळे पाहा नीट..या कारखान्याने दिले शेतकऱ्यांना या हंगामात तब्बल 552 कोटी रू. ऊसबिल !
पंढरपूर – 2022-23 च्या गळीत हंगामामध्ये विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना युनिट नं.1 व 2 कडे गाळपास आलेल्या ऊसाचे 10 मार्च अखेर पेमेंट ऊस पुरवठादारांना अदा करण्यात आले असून यासाठी एकूण 552 कोटी 36 लाख रूपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेे आहेत. तसेच ऊस तोडणी वाहतुकदारांना 28 फेब्रुवारी अखेर145 कोटी 54 लाख देण्यात आले आहेत.
एकीकडे अनेक साखर कारखाने ऊसबिलाच्या रकमा देण्यासाठी अजून ही धावपळ करत असताना दुसरीकडे राज्यात विक्रमी गाळप करणाऱ्या शिंदे कारखान्याने साडेपाचशे कोटी रूपये शेतकऱ्यांना देवू केले आहेत. याच बरोबर त्रिपक्षीय करारानुसार कामगारांना ही 12 टक्के वेतनवाढ देत एकूण 31 महिन्याचा फरक मिळून एकूण 5 कोटी 86 लाख रक्कम एकरकमी कामगारांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आली आहे. ही वेतनवाढ देणारा राज्यातील हा पहिलाच कारखाना आहे. यापूर्वी देखील विठ्ठलराव शिंदे कारखान्याने 15 टक्के वेतनवाढीचा फरक एकरकमी कामगारांना अदा केलेला आहे.
विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे युनिट नं.1 पिंपळनेर येथील सन 2022-23 गाळप हंगामाची सांगता झाली असून या हंगामामध्ये कारखान्याने विक्रमी गाळप केले असल्याची माहिती कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष आमदार बबनराव शिंदे यांनी दिली. पिंपळनेरमध्ये 18 लाख 41 हजार 420 मे.टन ऊस गाळप करून 16 लाख 52 हजार 800 क्विंटल साखर पोत्याचे उत्पादन झालेले आहे. तर युनिट नं.2 करकंब या कारखान्यात5 लाख 28 हजार 285 मे.टन गाळप करून 5 लाख 22 हजार 745 क्विंटल साखर उत्पादन झालेले आहे.
या हंगामात युनिट नं.1 कडील नवीन 300 केएलपीडी डिस्टीलरी प्रकल्प कार्यान्वित झाला असून सिरप व बी.हेव्ही पासून इथेनॉल उत्पादन घेण्यात आले आहे. आजअखेर हंगामामध्ये 2 कोटी 35 लाख लिटर्स इथेनॉल उत्पादन झाले असून 1 कोटी लीटर इथेनॉल ऑईल कंपन्यांना पुरवठा करण्यात आले आहे. आर्थिक वर्ष सन 2022-23 मध्ये आजअखेर 4 कोटी 70 लाख लिटर्स आर.एस. व 4 कोटी 28 लाख लीटर इथेनॉल उत्पादन झालेले आहे.