राज्य

सोलापूर जिल्ह्यात 3500 हेक्टर क्षेत्र गारपिटीने बाधित


पंढरपूर, दि. 19 –   सोलापूर जिल्ह्यातील आठ तालुक्यातील 104 गावांमध्ये गारपीट व पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये सुमारे 3 हजार 469 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले असून 4 हजार 500 शेतकरी हे बाधित झाले आहेत. अवकाळी पावसाने व गारपिटीने आंबा, पपई, टरबूज, कलिंगड, द्राक्ष अशा फळबागांचे तर ज्वारी, गहू, हरभरा अशा पिकांचे मोठे नुकसान झाले. सर्व नुकसानग्रस्त परिसराचे पंचनामे कृषी विभागाकडून सुरू करण्यात आले असल्याचे जिल्हा कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी सांगितले.
अवकाळी पाऊस व गारपिटीने नुकसान झालेल्या शेतपिकांचे तत्काळ पंचनामे करुन अहवाल सादर करावा, अशा सूचना आमदार समाधान आवताडे यांनी आज दिल्या. पंढरपूर तालुक्यात 1800 हेक्टर क्षेत्रावरील शेती व फळबागांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान पंचनामे सुरू करण्यात आले आहेत.
पंढरपूर तालुक्यात अवकाळी पाऊस तसेच गारपिटीने नुकसान झालेल्या शेत पिकांची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. तालुक्यातील गोपाळपूर येथील लेंगरे वस्ती, मस्के वस्ती तसेच मुंडेवाडी व कोंढारकी येथील नुकसानग्रस्त द्राक्ष, आंबा, गहू या पिकांची पाहणी त्यांनी केली. यावेळी त्यांच्या समवेत प्रांताधिकारी गजानन गुरव, जिल्हा कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, तहसीलदार सुशील बेल्हेकर, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, तालुका कृषि अधिकारी भागवत सरडे, मंडळ अधिकारी बाळासाहेब मोरे तसेच तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक उपस्थित होते.
पंढरपूर तालुक्यात साडेबाराशे हेक्टर फळपिकांचे तर गहू, हरभरा, मका या इतर पिकांचे असे मिळून एकूण 1800 हेक्टर पिकांचे शनिवारी झालेल्या गारपिटीने नुकसान झाले आहे. या पार्शवभूमीवर आमदार समाधान अवताडे यांनी अधिकार्‍यांसमवेत शेतशिवाराला भेट देवून पाहणी केली.  अवकाळी पाऊस व गारपिटीने हातातोंडाशी आलेले आलेले पीक उद्ध्वस्त झाले आहे. सर्व नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे असून तत्काळ मदतीची मागणी करण्यात येईल, असेही आवताडे यांनी सांगितले.
पंढरपूर तालुक्यातील नुकसानग्रस्त पिकांचे तत्काळ पंचनामे सुरु करण्यात आले असून, याचा अहवाल शासनास लवकरात लवकर शासनास सादर करण्यात येईल, असे प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी सांगितले. अचानक आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे संपकरी कर्मचारी हे पंचनामा करण्यासाठी कर्तव्यावर हजर झाले असल्याचेही गुरव यांनी सांगितले. दरम्यान संपकरी शासकीय कर्मचारी हे पंचनाम्यासाठी आल्याबद्दल आमदार आवताडे यांनी त्यांचे आभार मानले. रविवारी दिवसभर पंढरपूर भागातील नेते हे शेतांमध्ये जावून नुकसानाची पाहणी करत होते.
भाजपाचे नेते माजी आमदार प्रशांत परिचारक यांनीही पिकांची पाहणी करून शेतकर्‍यांच्या व्यथा जाणून घेतल्या. याचबरोबर राष्ट्रवादीचे युवा नेते भगीरथ भालके यांनी नुकसानग्रस्त बागांची पाहणी करून लवकरात लवकर पंचनामे व्हावेत व नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी केली आहे.

Header
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करणे हा IT Act 2000 नुसार गुन्हा आहे.
Close
Close