राजकिय

२०२१ ला गॅप घेतलेल्या प्रशांत परिचारक यांच्याकडून २०२४ च्या विधानसभा परीक्षेची तयारी सुरु !

पंढरपूर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक 2021 मध्ये भाजपाने जिंकण्यासाठी आमदार समाधान आवताडे व माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या गटांना एकत्र आणले होते. यास यशही आले मात्र आता अवघ्या दीड वर्षात परिचारक व आवताडे यांच्यात विविध कारणांनी वाद निर्माण झाले आहेत. विधानपरिषदेची निवडणूक लढवू पाहणाऱ्या परिचारकांनी मंगळवेढ्यात ज्या राजकीय खेळ्या सुरू केल्या आहेत ते पाहता ते आता  2024 च्या विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केल्याचे दिसत आहे.


प्रशांत परिचारक हे गेली अनेक वर्षे भाजपाचे सहयोगी सदस्य होते. 2014 त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून निवडणूक लढविली होती. तर 2015 मध्ये ते विधानपरिषदेला भाजपा पुरस्कृत अपक्ष उमेदवार होते. 2019 ला स्व. सुधाकरपंत परिचारक यांनी भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढविली होती. तेंव्हापासून हा गट भाजपात आल्याचे चित्र होते. तोवर त्यांनी भाजपाचे सहयोगी म्हणूनच भूमिका निभावली  होती. 2021 ला पोटनिवडणुकीत भाजपाने त्यांना थांबवून आमदार समाधान आवताडे यांना उमेदवारी दिली. सुरूवातीला परिचारक नाराज दिसले मात्र त्यांनी नंतर पक्षाचा आदेश पाळत आवताडे यांच्यासाठी प्रचार केला. आवताडे विजयी झाले.
यानंतर पंढरपूर भागात कोणताही कार्यक्रम असला तरी परिचारक व आवताडे एकत्र दिसत होते. आवताडे यांनीही कधी प्रशांत परिचारक यांचा शब्द मोडला नाही. मात्र गेल्य काही दिवसात परिचारक यांची भूमिका ही पुन्हा आपला गट मंगळवेढ्यात मजबूत करण्याचा दिसत आहे. जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषदेची निवडणूक पुढे ढकलली गेल्याने परिचारक गटाला वाट पाहावी लागत आहे. यातच भाजपात अनेक बडे  नेते जिल्ह्यात येवू पाहात आहेत. तर दुसरीकडे नवीन नगरपंचायती व नगरपरिषद निर्मितीमुळे आता मतदारसंख्या ही वाढली आहे. यामुळे येत्या काळात विधानपरिषदेचे तिकिट व विजय मिळविणे तितके सोपे राहिलेले नाही. येणारी लोकसभा निवडणूक पाहता भाजपा येथे बरजेच्या राजकारणासाठी अन्य कोणालाही उमेदवारी देवू शकते. हे पाहता परिचारक यांनी कोणावर अवलंबून न राहता विधानसभेचीही  तयारी सुरू केल्याचे चित्र आहे.
दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आ. आवताडे गटाला विरोध करत परिचारक यांनी मंगळवेढ्यातील त्यांच्या विरोधकांना एकत्र करत कारखाना जिंकला. यामुळे आवताडे नाराज झाले व त्यांच्या समर्थकांनी पंढरपूर भागात स्वतंत्र काम करण्याचा चंग बांधला. नगरपरिषद निवडणुकीतही सत्ताधारी परिचारक गटाला कदाचित पुढील काळात आवताडे समर्थक विरोधक करतील व स्वतंत्र पॅनल लावू शकतात. अथवा विरोधकांची छुपी युती होवू शकते, अशी चर्चा आहे. यातच गणेशोत्सव विसर्जन मिरवुणकीच्या वेळी आ. समाधान आवताडे यांचे स्वागत व्यासपीठ ही उभारण्यास परिचारक समर्थकांनी विरोध केल्याची चर्चा रंगली. यामुळेच गणेश विसर्जनाच्या दिवशीची परिचारक व आवताडे यांच्या युतीचेही विसर्जन झाले की काय? अशी स्थिती होती.
एमआयडीसी बाबतच्या बैठकीला प्रशांत परिचारक उपस्थित नव्हते मात्र त्यांचे विरोधक असणार मनसे नेते दिलीप धोत्रे आमदार आवताडे यांच्यासोबत दिसत होते. याचबरोबर मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या घोषणेनंतर मंगळवेढ्याच्या कार्यक्रमात परिचारक दिसलेच नाहीत. एकंदरीत परिचारक व आवताडे यांनी आपल्या वाटा वेगळ्या केल्याचे चित्र आहे. येत्या नगरपरिषद , पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत याचे पडसाद उमटणार हे निश्‍चित आहे.
परिचारक व आवताडे हे दोघेही भाजपात असले तरी विधानसभेच्या वेळी कोण कोणता निर्णय घेणार हे त्याचवेळी समजून येर्इल. परिचारक यांचे सर्वच राजकीय पक्षांशी संबंध आहेत. अनेक वर्षे त्यांचे जिल्हयाच्या राजकारणात योगदान आहे. तर आवताडे हे सतत संघर्ष करून तिसऱ्या वेळी विधानसभ निवडणुकीत विजयी झाले आहेत.  यातच आता पंढरपूरच्या राजकारणात बदल होवू लागले असून विठ्ठल कारखाना जिंकल्यानंतर अभिजित पाटील यांनी राजकारणात उतरण्याचे संकेत दिले आहेत. त्यांची ओळख परिचारक विरोधक अशी असल्यानेे आगामी काळात नवीन समीकरण दिसू शकतात.  

Header
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करणे हा IT Act 2000 नुसार गुन्हा आहे.
Close
Close