राज्य

भीमा खोर्‍यावर पाऊस रूसला, उजनी लाभक्षेत्रात चिंता

पंढरपूर –  भीमा खोर्‍यात पावसाचा जोर नसल्याने तेथील धरणं अगदी संथ गतीने  भरत असून उजनीत येणारी आवक ही अत्यंत कमी असल्याने शेवटचा हा प्रकल्प अद्याप वजा 6.73 टक्के स्थितीत आहे.
उजनी धरणावर पावसाळा हंगामात आजवर 196 मिलीमीटर पाऊस नोंदला गेला असून बुधवारीही 16 मि.मी. पर्जन्यमान नोंदले गेले आहे. मात्र भीमा खोर्‍यात पाऊसाचा जोर नसल्याने तेथून उजनीला पाणी मिळणे अवघड बनत चालले आहे. दौंडजवळून या धरणात केवळ 2470 क्युसेक पाणी मिसळत आहे. हे धरण मृतसाठ्यातून उपयुक्त पातळीत भरण्यासाठी अजूनही 3.61 टीएमसी पाण्याची गरज आहे.
उजनी धरणावर रोज पावसाची हजेरी असली तरी पुणे जिल्ह्यात भीमा खोर्‍यातील अन्य प्रकल्पांवर अत्यंत कमी स्वरूपात पर्जन्यमान नोंदले जात आहे. मागील चोवीस तासात वडीवळे10, मुळशी 10, टेमघर20, वरसगाव 13, पानशेत 14 मि.मी. असा किरकोळ पाऊस नोंदला गेला आहे. यंदा सोलापूर जिल्ह्यासह उजनी जलाशयावर पावसाचा जोर असला तरी भीमा खोर्‍यात नसल्याने ही चिंतेची बाब म्हणावी लागणार आहे. उजनी भरण्यासाठी भीमा खोर्‍यात चांगला पाऊस होवून तेथील  प्रकल्प भरणे आवश्यक असते.
14 जुलै रोजी भीमा नीरा खोर्‍यातील धरणांची स्थिती पुढील प्रमाणेः पिंपळगाव जोगे 0 टक्के, माणिकडोह 10.59, येडगाव 45.04, वडज 39.09, डिंभे 23.52, घोड 8.65, विसापूर 9.92,  कलमोडी 47.69, चासकमान 20.21, भामा आसखेड 41.60, वडीवळे 32.12, आंध्रा 70.08, पवना 33.95, कासारसाई 64.51, मुळशी 11.41, टेमघर 17.95, वरसगाव 27.47, पानशेत 39.32, खडकवासला 36.09 टक्के. नीरा खोरेः  गुंजवणी 39.18, नीरा देवघर 25.99, भाटघर 20.94, वीर 40.85 , नाझरे 9.25 टक्के.
यंदा उन्हाळा संपताना पावसाळा सुरू होताना या सर्व धरणांमध्ये चांगला पाणीसाठा शिल्लक होता. मात्र पावसाने अनेक ठिकाणी ओढ दिल्याने आता पाणीसाठे कमी होवू लागले आहे. मुळा मुठा खोर्‍यात पर्जन्यराजाची अद्याप कृपा न झाल्याने पुण्यासह पिंपरी चिंचवडला पाणी पुरवठा करणार्‍या धरणांमधील पाणी आता कमी कमी होत चालले आहे. ही धरणे भरल्यावर  तेथून सोडल्या जाणार्‍या पाण्यामुळे उजनीला ही मोठा फायदा होतो. याच बरोबर पवना, मुळशीसह सह भीमा उपखोर्‍यातील प्रकल्पावर देखील पावसाचे प्रमाण कमी आहे.

Header

Related Articles

Back to top button
Close
Close