Great : स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला युजीसीकडून स्वायत्तता दर्जा प्रदान
पंढरपूर- गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅड रिसर्च इन्स्टिट्यूट तथा स्वेरी संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला देशातील शैक्षणिक क्षेत्रातील महत्वपूर्ण असलेला ‘स्वायत्त’ अर्थात ’ऑटोनॉमस दर्जा’ प्राप्त झाला आहे. तो शैक्षणिक वर्षे 2024-2025 ते 2033-2034 अशा एकूण दहा वर्षांसाठी असणार आहे.
युजीसी (युनिव्हर्सिटी ग्रँटस कमिशन) व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांच्याकडून तसे पत्र महाविद्यालयास नुकतेच प्राप्त झाले असल्याची माहिती स्वेरीचे संस्थापक सचिव व इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांनी दिली.
अलीकडेच ‘नॅक’च्या त्रिसदस्यीय समितीने महाविद्यालयास प्रत्यक्ष भेट देऊन स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला 4 पैकी 3.46 सीजीपीए सह ’ए प्लस’ ही ग्रेड दिलेली होती. एवढ्या स्कोअर सह ’ए प्लस’ ग्रेड मिळवणारे हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील एकमेव अभियांत्रिकी महाविद्यालय ठरले आहे.
‘नॅक’चे ’ए प्लस’ मानांकन मिळाल्यामुळे स्वेरीमधील शिक्षणाच्या दर्जावर शिक्कामोर्तब झाले होते. या पूर्वी महाविद्यालयाला नॅकचे एकदा तर महाविद्यालयातील पात्र अभ्यासक्रमांना ’एनबीए’ चे दोनदा मानांकन मिळालेले आहे तसेच एन.आय.आर. एफ या राष्ट्रीय पातळीवरील रँकिंग मध्ये 151- 300 च्या बँड मध्ये स्वेरी ने स्थान मिळवले आहे. स्वेरीत वापरल्या जाणार्या ’आर-वर्क’ या ईआरपी प्रणालीचा या यशात सिंहाचा वाटा आहे.
स्वेरीला आजपर्यंत जवळपास 33 संशोधन प्रकल्पांमधून सुमारे 44.34 कोटी इतका संयुक्त संशोधन निधी महाविद्यालयास मंजूर झाला आहे. या माध्यमातून अद्ययावत प्रयोगशाळांची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच या महाविद्यालयाने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील सुमारे 35 संस्थांसोबत सामंजस्य करार केले असून येथील 32 प्राध्यापक पीएच.डी. धारक असून आणखी 28 प्राध्यापक पीएच.डी. पूर्ण करण्याच्या मार्गावर आहेत. संशोधनाच्या माध्यमातून अभियांत्रिकी व तंत्रज्ञानाशी संबंधित सुमारे 44 पुस्तके आजपर्यंत प्रकाशित झाली असून 47 पेटंट्स देखील दाखल करण्यात आले आहेत.
स्वेरीचे संस्थापक सचिव व इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे, स्वेरीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सर्व विश्वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार व आय.क्यू.ए.सी. व स्वायत्तता समन्वयक डॉ. संदीप वांगीकर, कॅम्पस इन चार्ज डॉ. एम.एम. पवार, सर्व अधिष्ठाता, सर्व विभागप्रमुख, स्वेरी परिवारातील व अभियांत्रिकी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी हा दर्जा प्राप्त करण्यासाठी परिश्रम घेतले.