राजकिय

जिल्हा “सहकारी” बँकेच्या निवडणुकीवरून “राजकारणाला” ऊत, रणधुमाळी लांबल्याने भाजपा “अस्वस्थ” तर राष्ट्रवादी “समाधानी”


पंढरपूर- मध्यंतरीच्या काळात आर्थिक संकटात आलेल्या सोलापूर जिल्हा बँकेची स्थिती आता सुधारत असून अद्यापही  162.76 कोटी रूपये  इतका संचित तोटा आहे. सध्या शेती कर्जाच्या वसुलीस अडचणी येत आहेत. त्यामुळे हा तोटा भरुन काढण्यासाठी काही कालावधी लागणार आहे. त्याचबरोबर सीआरएआर पूर्तता होण्यासाठी विशेषत्वाने प्रयत्न होणे गरजेचे आहे. यासाठी बँकेच्या थकबाकीचे प्रमाण कमी करण्याकरिता प्रभावशाली उपाययोजना करणे आवश्यक आहे. हे पाहता येथे इतक्यात निवडणूक नको, अशी भूमिका घेत यासह राज्यातील चार जिल्हा बँकाच्या निवडणुका मार्च 2022 पर्यंत पुढे ढकलल्या गेल्या आहेत. मात्र यानंतर जिल्ह्यात भाजपा व राष्ट्रवादीत शाब्दिक चकमकी सुरू झाल्या आहेत.
शेतकर्‍यांचा आर्थिक कणा असलेल्या व आर्थिक अडचणीतून प्रगतीकडे मार्गक्रमण करीत असलेल्या सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (डीसीसी) संचालक मंडळाची निवडणूक 31 मार्च 2022 पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. सोलापूरबरोबरच नाशिक, नागपूर आणि बुलढाणा येथील जिल्हा बँकांचीही निवडणूक पुढे ढकलण्यात आल्याने बँकेवरील विद्यमान प्रशासकांना मुदतवाढ मिळाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सहकार विभागाने आदेश काढून सोलापूरसह चारही जिल्हा बँकांच्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. बँक आर्थिक सुस्थितीत येण्यासाठी बँकेवर नियुक्त केलेला प्रशासक काही कालावधीसाठी कार्यरत असणे महत्त्वाचे आहे. असे कारण पुढे करुन राज्य शासनाने सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक 31 मार्च 2022 पर्यंत पुढे ढकलण्यात येत असल्याचे आदेशात म्हटले आहे.
दरम्यान हा आदेश येताच सोलापूर जिल्ह्यात सहकारी संस्थांमधील राजकारणाला ऊत आला असल्याचे दिसत आहे. भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी या निर्णयाबाबत आश्‍चर्य व्यक्त करत जर निवडणूक झाली तर भाजपाला प्राबल्य मिळेल या भीतीने राष्ट्रवादीच्या एका आमदाराने ही निवडणूक प्रक्रिया पुढे ढकल्याचे सांगितले. दरम्यान याबाबत बोलताना आमदार संजय शिंदे यांनी अगोदर बँक वाचणे महत्त्वाचे असल्याचे सांगत सत्तेचे नंतर पाहू अशी प्रतिक्रिया दिली. ज्या नेतेमंडळींमुळे बँक अडचणीत आली, ते नेते सध्या भाजपमध्ये असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे. प्रशासकांमुळे बँकेची परिस्थिती सुधारत आहे. ज्यांनी पक्षांतर केले त्यांच्याकडील वसुली प्रशासकामुळे होऊ शकते. त्यामुळेच प्रशासकच राहणे गरजेचे आहे. नंतर कोणाची सत्ता येईल, हे बघता येईल. सत्तेसाठी राजकारण न करता घेतलेल्या या निर्णयाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांचे आभार मानावे तितके कमीच आहेत, असे आमदार शिंदे म्हणाले.

भारतीय जनता पक्षाने ही आपली भूमिका स्पष्ट केली असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनीच जिल्हा मध्यवर्ती बँकेचे वाटोळे केले. हे आता लपून राहिलेले नाही. लोकांचा आता त्यांच्यावर विश्‍वास राहिलेला नाही. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघासारखी पुनरावृत्ती होऊन जिल्हा बँकेची सत्ता भाजपच्या हाती जाईल. याची भीती राष्ट्रवादीच्या नेत्यांना आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील एका आमदाराने मंत्रालयात ठाण मांडून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासमोर व्यथा मांडली. त्यामुळेच सरकारने निवडणूक पुढे ढकलली आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बँकेची निवडणूक कधीही लावावी. बँकेवर भाजपचीच सत्ता येईल, असे भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी म्हटले आहे.
दरम्यान सोलापूर जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाची ताकद वाढत असून खासदार व आमदारांची संख्या वाढली आहे. यातच पंढरपूर  पोटनिवडणुकीतील विजयामुळे तर या पक्षाचे बळ आणखीच वाढले आहे. आता भाजपा जिल्ह्यातील सहकारी संस्था ताब्यात घेण्याच्या तयारीत आहे. पूर्वीचे राष्ट्रवादीमधील बरेच नेते आता भाजपाबरोबर असल्याने त्यांना जिल्हा बँकेतही आपली सत्ता येईल असे वाटत आहे. यामुळेच ते निवडणुकीसाठी आतूर झाले आहेत.

Header

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close