आनंदवार्ता: माळशिरससह चार तालुक्यातील 43 हजार हे. क्षेत्राला पाणी मिळणार
अकलूज – मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत निरा देवघर प्रकल्पासाठी 3 हजार 976 कोटी 83 लाख रूपयांची तिसरी सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे माळशिरस, फलटण, खंडाळा, भोर तालुक्यातील 43 हजार 50 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहेत.
निरा देवघर धरण प्रकल्पाची सुधारित प्रशासकीय मान्यता शासनाकडे प्रलंबित असून तिला तत्काळ मान्यता देऊन यासाठी निधीची तरतूद करून दुष्काळी भागाला पाणी उपलब्ध करुन द्यावे व प्रकल्पाची उर्वरीत कामे लवकरात लवकर मार्गी लावण्यात यावे म्हणून आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला होता. तसेच हिवाळी अधिवेशनात सभागृहात देखील याबाबतची मागणी केलेली होती.
निरा देवघर धरणाचे काम सन 2008 साली पूर्ण झाले असून खंडाळा तालुक्यापर्यंत 65 किलोमीटरचे कालवे पूर्ण झाले आहेत. मात्र उर्वरीत खंडाळा, फलटण व माळशिरस तालुक्यातील कालव्याची कामे अद्यापपर्यंत झालेली नव्हती. मिंऋमंडळाने दिलेल्या प्रकल्पांच्या तिसर्या सुधारित मान्यतेमुळे आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या प्रयत्नातून निरा देवघर प्रकल्पांच्या रखडलेल्या कामे मार्गी लागून सातारा जिल्हयातील फलटण 13 हजार 550 हेक्टर , भोर,6 हजार 670 हेक्टर, खंडाळा 11 हजार 860 हेक्टर तर सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील अवर्षण प्रवण भागात 10 हजार 970 हेक्टर असे एकूण 43 हजार 050 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.
अनेक वर्षांपासून रखडलेल्या पाणी प्रश्न मोहिते-पाटील यांनी प्राथमिकता देत सोडवल्याने माळशिरस, फलटण, खंडाळा, भोर तालुक्यातील अवर्षणप्रवण भागातील शेतकर्यांनी त्यांचे आभार मानले आहेत.