आबांची कारखानदारीतून विकासात्मक साखरपेरणी तरूणाईला भावतेय
एखादा साखर कारखाना चालविणे किती जिकरीचे असते हे आजवर आपण नेहमीच पाहात आलो आहोत. मात्र राज्याच्या विविध भागात पाच कारखाने सहजपणे व यशस्वीरित्या चालविणारे पंढरपूरचे अभिजीतआबा पाटील आता सहकारातही उतरले आहेत. त्यांनी वेणूनगरच्या विठ्ठल कारखान्याची निवडणूक लढविली आणि त्यांच्या कारखानदारीतील कामावर विश्वास ठेवून सभासदांनीही पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात आलेल्या पाटील यांना विजयी करत प्रस्थापितांना बाजूला सारले. विकासात्मक दृष्टीकोन असणार्या अभिजीत पाटील यांच्या पाठीशी पंढरपूर तालुक्याती तरूणाई भक्कमपणे उभी राहताना दिसत आहे. सहकाराबरोबरच ते राजकारणात ही लवकरच आपला ठसा उमटवतील असे दिसत आहे.
अभिजीत पाटील यांनी वयाच्या चाळीशीच्या आतच राज्यभरात आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे. साखर कारखानदारीत यशस्वीपणे काम केल्याने त्यांचा सतत बहुमान होत आहे. धाराशिव, नांदेड, नाशिक , सांगोला व आता बीड भागात ही ते कारखाना चालवित आहेत. नुकताच आणखी एक साखर कारखाना त्यांची चालविण्यास घेतला आहे. सांगोला कारखाना जो बारा वर्षे बंद होता तो अवघ्या पस्तीस दिवसात गाळपासाठी तयार करून मागील सीझनला त्यांनी साडेतीन लाख मे. टन ऊस गाळला होता. त्यांचे हे काम पाहूनच विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सभासदांनी त्यांच्यावर विश्वास टाकला आहे. विठ्ठल कारखान्याची बिघडलेली आर्थिक घडी बसविणे, कारखाना सुरू करणे यास त्यांनी प्राधान्य दिले आहे. यंदाच्या हंगामात साडेबारा ते तेरा लाख टन ऊस गाळपाचे उदिष्ट त्यांनी ठेवले आहे व त्यादृष्टीने कामे सुरू आहेत.
अभिजीत पाटील यांनी साखर कारखानदारीबरोबरच इतर व्यवसायातही चांगली प्रगती केली असून त्यांच्या समृध्दी ट्रॅक्टर या फर्मची यशस्वी घौडदौड सुरू असून सर्वाधिक जास्त ट्रॅक्टरची विक्री तेथून होत असल्याने त्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर ही गौरविले जात आहे. हॉटेल व्यवसाय असो की मॉल, डीव्हीपी स्वेअर तसेच मल्टीप्लेक्सच्या माध्यमातून त्यांनी तरूणांच्या हाताला काम दिले आहे. शेकडो युवक पाटील यांच्यासमवेत साखर कारखानदारी व अन्य व्यवसायात काम करत असल्याने आता पंढरपूरच्या विकासातही त्यांचे योगदान दिसत आहे.
मितभाषी व सर्वांत मिळून मिसळून राहणारे म्हणून प्रसिध्द असणार्या अभिजीत पाटील यांना पंढरपूर भागातील राजकारण ही खुणावतेय. विठ्ठल कारखाना त्यांनी जिंकल्यानंतर सहाजिकच त्यांच्याकडून आता अपेक्षा वाढल्या आहेत. त्यांना मिळणारा पाठिंबा व सतत कामात व्यस्त राहण्याची त्यांची सवय त्यांना राजकारणातही यशस्वी करेल. सर्वच राजकीय पक्षांशी व नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून ते साखर कारखानदारी तसेच उपपदार्थ निर्मितीबाबतचे सतत मार्गदर्शन घेत असतात. त्यांनी धाराशिव कारखान्यात कोरोनाकाळात विक्रमी काळात उभ्या केलेल्या ऑक्सिजन प्रकल्पाची चर्चा राज्यभर होती. यासाठीच त्यांनी गडकरी यांच्या हस्ते गौरविण्यात आले होते. सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असोत की विरोधीपक्ष नेते अजित पवार या सार्यांशी अभिजीत पाटील यांनी चांगले संंबंध जपले आहेत.
साखर कारखानदारी व अन्य व्यवसायांप्रमाणे आगामी काळात अभिजीत पाटील हे राजकारणात ही यशस्वी होणार हे निश्चित आहे. विकासात्मक नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. त्यांच्याकडे अनेक योजना आहेत. पंढरपूर व परिसरात चांगला विकास व्हावा, अशी त्यांची भावना आहे. त्यांच्या मनोकामना श्री विठ्ठल रूक्मिणीमाता पूर्ण करो अशी सदिच्छा व्यक्त करत त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .