विशेष

पंढरपूर तालुक्यात मंगळवारी २ हजार ८१८ चाचण्यात १४२ कोरोना रूग्ण आढळले

पंढरपूर,दि.३- राज्यात आता सर्वत्र अनलॉक होत असताना मात्र पंढरपूरच्या ग्रामीण भागात अजूनही रूग्णसंख्या जास्त असल्याने प्रशासन पुन्हा संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहे. सोमवार पासून तालुक्यातील प्रत्येक गावात कोरोनाच्या चाचण्या घेण्यास सुरूवात केली आहे.मंगळवारी २ हजार ८१८ चाचण्या घेण्यात आल्या. यामध्ये १४२ रूग्ण आढळून आले आहेत.

मार्च २०२० मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला मात्र या संसर्गाने पंढरपूर भागात खरा रंग दाखविला तो ऑगस्ट २०२० नंतर आणि पाहता पाहता हा तालुका कोरोनाचे हॉटस्पॉट बनला. पहिली लाट या भागासाठी खूप विदारक ठरली. कारण अनेक मातब्बरांचे या काळात निधन झाले. यानंतर दुसर्‍या लाटेतही सर्वाधिक रूग्ण याच तालुक्यात सापडले आहेत. सोलापूर जिल्हा ग्रामीणचा विचार केला तर अकरा तालुक्यात सर्वाधिक रूग्णसंख्या ही पंढरपूर तालुक्याची आहे. सध्या कोरोनाची वाटचाल तीस हजाराकडे सुरू आहे. जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांच्या अहवालानुसार आज पर्यंत तालुक्यात २८ हजार ८३३  रूग्ण आढळून आले आहेत. सोमवारी तालुक्यात विविध ठिकाणी मिळून एकूण ३ हजार ५८१ चाचण्या करण्यात आल्या यामध्ये १२८ रूग्ण आढळले होते. तर मंगळवारी २ हजार ८१८ चाचण्या घेण्यात आल्या. यामध्ये १४२ रूग्ण आढळून आले आहेत. पाँझिटिव्हिटी दर 4 .32 टक्के आहे. पंढरपूर तालुक्यात कोरोनामुळे एकूण मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या ५४० इतकी आहे जी जिल्ह्यात सर्वाधिक आहे.पहिल्या व दुसर्‍या लाटेत पंढरपूरकरांनी या संसर्गाचा समर्थपणे सामना केला आहे. शासन व प्रशासन एका बाजूला आजार थोपविणे आणि अर्थकारण चालविण्याचा प्रयत्न करत आहे. कडक निर्बंध कमी करून हळूहळू शिथिलता दिली जात असताना पुन्हा पंढरपूरच्या ग्रामीण भागात कोरोनाने डोके वर काढले आहे. तिसर्‍या लाटेची शक्यता सतत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. यामुळे आता  येथील जनतेने याचा विचार करणे गरजेचे बनले आहे.कोरोनाची संख्या जिल्हयतील अन्य काही तालुक्यांमध्ये कमी झाली असली तरी माळशिरस, पंढरपूर भागात अद्यापही संख्या नियंत्रणात नसल्याने जिल्हा आरोग्य यंत्रणा ही चिंतेत आहे. मंगळवारी शहरातील व्यापार्‍यांच्या तसेच ग्रामीण भागात अनेक गावांमध्ये कॅम्प आयोजित करण्यात आले होते. कोरोना रूग्ण शोधून त्यांच्या उपचार करणे व संसर्ग रोखण्याचा प्रयत्न आहे. आता या मोहिमेस नागरिकांन सहकार्य करणे गरजेचे बनले आहे. प्रातांधिकारी सचिन ढोले, तहसीलदार सुशील बेल्हेकर, पोलीस उपअधीक्षक विक्रम कदम, मुख्याधिकारी माळी यांच्यासह विविध विभाग कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आरोग्य अधिकारी डॉ.एकनाथ बोधले व त्यांचे सहकारी सतत यासाठी काम करत आहेत. अशा वेळी आता ग्रामीण व  शहरी जनतेने नियम पाळून आपले आरोग्य जपणे आवश्यक आहे. कोरोनाच्या दोन लाटांनी पंढरपूरचे अर्थकारण कोलमडले असताना आता जर तिसर्‍या लाटेचा सामना करताना कडक निर्बंध लावले गेले तर आर्थिक स्थिती बिकट होवू शकते याचा विचार करून एका बाजूला अर्थकारण सावरणे व दुसर्‍या बाजूला कोरोनाविषयक नियम पाळून समन्वय साधण्यास प्राधान्य देण्याशिवाय आता पर्याय नाही.

Header

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करणे हा IT Act 2000 नुसार गुन्हा आहे.
Close
Close