राज्य

राज्यातील 178 कारखाने बंद, साखर उत्पादन गतहंगामापेक्षा जास्त, यंदा उताराही वाढला


पंढरपूर –  राज्यात 2023-24 चा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात असून या हंगामात साखरेचे उत्पादन 108 लाख टनांच्या पुढे गेले ते असून ते गतहंगामापेक्षा जास्त झाले आहे. अद्याप 29 साखर कारखाने सुरू आहेत.
साखर आयुक्तालयाच्या अहवालानुसार या हंगामात एकूण 207 साखर कारखान्यांनी गळीत हंगामात सहभाग घेतला होता. त्यामध्ये 103 सहकारी आणि 104 खासगी साखर कारखान्यांचा समावेश आहे.  7 एप्रिलपर्यंत 1059.18 लाख टन उसाचे गाळप झाले असून 1084.73 लाख क्विंटल (108.47 लाख टन) साखरेचे उत्पादन झाले आहे. गत हंगामात 211 साखर कारखान्यांनी गाळपात सहभाग घेतला होता आणि 1053.91 लाख टन उसाचे गाळप करून 1052.38 लाख क्विंटल (105.23 लाख टन) साखरेचे उत्पादन केले होते.
महाराष्ट्रात चालू हंगामात मागील वर्षीच्या तुलनेत 178 साखर कारखान्यांनी गाळप थांबवले आहे, तर गेल्या हंगामात  7 एप्रिलपर्यंतच सर्व 211 साखर कारखान्यांचा हंगाम संपला होता. तसेच या हंगामात साखर उतार्‍यात वाढ दिसून आली आहे. 2023-24 च्या हंगामात राज्यात सरासरी साखर उतारा 10.24 टक्के आहे, तर मागील हंगामात तो 10 टक्के इतका होता.
या हंगामात कोल्हापूर विभागात, सोलापूर विभागात 45 , पुणे विभागातील 26 , अहमदनगर 18, छत्रपती संभाजीनगर विभागात 19, नांदेड विभागात 25, नागपूर विभागात 2 तर अमरावती विभागातील 4 अशा 178 साखर कारखान्यांनी हंगाम बंद केला आहे.
विभागनिहाय साखर उत्पादन व सरासरी साखर उतारा टक्केवारी – कोल्हापूर विभागात 278.6 लाख क्विंटल (11.57 टक्के),  पुणे 244.72 (10.48), सोलापूर 202.79 (9.38), अहमदनगर 136.68 (9.97), छत्रपती संभाजी महाराज नगर 87.31 (8.93), नांदेड 120.42 (10.25), अमरावती 9.34 (9.4), नागपूर 2.87 लाख क्विंटल (6.46 टक्के).

Header
Tags

Related Articles

Back to top button
Close
Close