कर्नाटक निकालानंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीची बैठक झाली
मुंबई – कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील निकालाच्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथील त्यांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीतील सर्व मित्रपक्षांची आढावा बैठक पार पडली. या बैठकीला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभा विरोधी पक्षनेते अजितदादा पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री अशोक चव्हाण, खासदार संजय राऊत, खासदार सुप्रियाताई सुळे, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, आमदार भाई जगताप, माजी आमदार नसीम खान उपस्थित होते.
यावेळी कर्नाटकात भाजपाचा झालेला पराभव, त्यास कारणीभूत असणाऱ्या घटना तसेच या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही महाविकास आघाडीने आखावयाची व्यूहरचना यावर चर्चा झाली. महाविकास आघाडीतील एकवाक्यता, उर्वरित वज्रमूठ सभा, नुकताच लागलेला सर्वोच्च सत्तासंघर्षावरील निकाल यावर या बैठकीत चर्चा झाली. याचबरोबर लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटप यावरही मंथन झाले.