सहकार शिरोमणी कारखाना निवडणुकीत मध्यस्थीस पवारांचा नकार !
पंढरपूर – पंढरपूर तालुक्यातील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत हस्तक्षेप करण्यास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नकार दिला असून विठ्ठल कारखान्याप्रमाणेच आपली भूमिका ठेवली आहे.
याबाबत नुकतीच मुंबई येथे विठ्ठल परिवारातील नेत्यांसह त्यांनी बैठक बोलावली होती. श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर सहकार शिरोमणी कारखान्याची निवडणूक लढवू नये ,असे मत या पक्षाचे पंढरपूरचे नेते व कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांची होते. याबाबत त्यांनी शरद पवार यांच्याशी सोलापूर येथे चर्चा केली होती. सहकार शिरोमणी कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू असून यात अभिजीत पाटील हे डॉ. बी.पी. रोंगे यांना बरोबर घेऊन पॅनल लावण्याच्या तयारीत आहेत. याच दरम्यान त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश झाला आहे. ही निवडणूक राष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये होत असल्याचे चित्र आहे. कल्याणराव काळे हे पोटनिवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दाखल झाले होते. दरम्यान येथील विठ्ठल परिवार व राष्ट्रवादी काँग्रेसमधील असणारे मतभेद पाहता पवार यांनी काळे, भगीरथ भालके, कल्याणराव काळे यांच्यासह अन्य नेत्यांना मुंबई चर्चेसाठी बोलले होते.
या बैठकीत कारखान्याबाबत पवार यांनी कोणतीही सूचना अभिजीत पाटील यांना केली नाही. यामुळे ते या कारखान्याच्या निवडणुकीत मध्यस्थी अथवा हस्तक्षेप करणार नाहीत हे निश्चित झाले आहे. यापूर्वी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या वेळी पवार यांनी तीनही गटांना निवडणूक लढा व जो जिंकून येईल त्यास आपण मदत करू ,असे सांगितले होते. सहकार शिरोमणी कारखान्याच्या निवडणुकीतही पवार यांनी आपली तिच भूमिका ठेवली आहे. सध्या या कारखान्याच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. मोठ्या प्रमाणात इच्छुकांनी अर्ज नेले असून ही निवडणूक चुरशीची होणार हे निश्चित आहे. अभिजीत पाटील व दीपक पवार यांच्या गटात समझोता होणार का? याकडे कार्यक्षेत्राचे लक्ष लागून राहिले आहे. दीपक पवार हे कारखान्याचे माजी संचालक असून ते चंद्रभागा परिवारातील मातब्बर नेते मानले जातात. त्यांना मानणारा सभासद वर्गही मोठा आहे. मागील निवडणुकीत त्यांनी दोन हजाराहून अधिक मत घेतली होती. या निवडणुकीत पवार व पाटील दोघांनी एकत्र यावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांच्यासमोर मोठे आव्हान उभे करण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे.