राजकिय

कोल्हापूरच्या निकालानंतर पुन्हा पंढरपूर पॅटर्न वरून घमासान

उत्तर कोल्हापूर विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसने घवघवीत यश मिळत भाजपाला धूळ चारली. या निवडणुकीत भाजपाने सतत पंढरपूरच्या निकालाची पुनरावृत्ती होईल असे सांगितले होते. मात्र महाविकास आघाडीच्या एकीपुढे त्यांचे काहीही चालले नाही. तेथील निकाल जाहीर होताच पंढरपूर भागात पुन्हा मागील वर्षीच्या पोटनिवडणुकीवर समाज माध्यमातून जोरदार चर्चा सुरू झाली व परिचारक गटामुळेच येथील जागा भाजपा जिंकू शकल्याचा दावा समर्थक करताना दिसत आहेत. तर दुसरीकडे ताकद असतानाही राष्ट्रवादीने पंढरपूरची जागा गमावल्याचे शल्य  या पक्षाच्या कार्यकर्त्यांना अद्यापही असल्याचे जाणवत असून येत्या निवडणुकीत पुन्हा जागा जिंकू, अशा पोस्ट केल्या जात आहेत. त्यामुळे निकाल उत्तर कोल्हापूरचा लागला असला तरी पंढरपूर पॅटर्नवरून घमासान मात्र पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात सुरू आहे.

उत्तर कोल्हापूर विधानसभा पोटनिवडणुकीकडे पंढरपूरच्या जनतेचे जास्त लक्ष होते. कारण तेथे भाजपाने पंढरपूरप्रमाणे व्यूहरचना आखली होती. सत्यजीत कदम यांना भाजपात आणून तिकिट दिले. तेथील पक्षातील सर्वांना एकत्र आणत शक्तीप्रदर्शन केले. सुरूवातीपासून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे कोल्हापूरमध्ये पंढरपूर पॅटर्न प्रमाणे आम्ही यशस्वी होवू असा दावा करत होते. मात्र काहीही उपयोग झाला नाही. राज्यात पहिली पोटनिवडणूक ही पंढरपूरची झाली होती. 2020 मध्ये स्व. आमदार भारत भालके यांचे निधन झाल्याने एप्रिल 2021 मध्ये मतदान झाले होते. वास्तविक पाहता येथे सहानुभूतीची लाट असतानाही राष्ट्रवादीने जागा गमावली होती. यामुळे पंढरपूर पॅटर्नचा भाजपाने खूप गवगवा केला. येथे भाजपाचे काम पाहणारे माजी आमदार प्रशांत परिचारक यांना उमेदवारी  न देता 2014 ला शिवसेना व 2019 ला अपक्ष लढलेल्या आमदार समाधान आवताडे यांना संधी भाजपाने दिली व परिचारकांची ताकद त्यांच्या पाठीशी लावली. याच बरोबर उमेदवारी देताना मंगळवेढ्याला संधी मिळाल्याने भूमिपूत्र मुद्द्यावर त्या तालुक्यातील मतं घेण्याचा प्रयत्न या पक्षाने केला होता.
पंढरपूरच्या पोटनिवणुकीत आवताडे व परिचारक गट एकत्र आल्याने सहाजिकच भाजपाला फायदा झाला. मात्र असे असले तरी राष्ट्रवादीची ताकद येथे कमी नव्हती. भालके कुटुंबाप्रती असलेली सहानुभूती, स्व. भारत भालके यांचे काम यामुळे त्यांचे चिरंजीव भगीरथ भालके हे सहज विजयी होतील, अशी स्थिती होती. राज्यात सत्तेत असलेले तीनही पक्ष पंढरपूरमध्ये एकत्र होते. भाजपाने प्रचाराचा झंझावात उभा केला होता. 3700 मतांच्या फरकाने येथे भाजपाचे समाधान आवताडे विजयी झाले. हा धक्कादायक निकाल जिल्हा व प्रदेश राष्ट्रवादीला अनेक दिवस पचवता आला नाही. यानंतर देगलूरची पोटनिवडणूक काँगे्रसने सहज म्हणजे 41 हजार मतांच्या फरकाने जिंकली तर उत्तर कोल्हापूरमध्ये 18 हजार 800 चे मताधिक्क्य मिळवत भाजपाला पराभूत केले.
उत्तर कोल्हापूरचा निकाल जाहीर होताच पंढरपूर मतदारसंघातही 2021 च्या पोटनिवडणुकीची चर्चा रंगू लागली. देगलूर व कोल्हापूरमध्ये भाजपाची डाळ शिजली नाही मात्र पंढरपूरमध्ये ते विजयी झाले होते. याचे श्रेय प्रशांत परिचारक यांनाच जाते , अशा पोस्ट सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. भाजपासाठी परिचारक यांनी त्याग करत आपली ताकद समाधान आवताडे यांच्या पाठीशी लावल्यानेच केवळ पंढरपूरची जागा भाजपाने जिंकल्याचा दावा केला जात आहे. एक वर्षानंतर पुन्हा पोटनिवडणुकीच्या आठवणी यानिमित्ताने ताज्या होताना दिसत आहेत. तर दुसरीकडे येथील पराभवातून अद्यापही न सावरलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मात्र आता उत्तर कोल्हापूरमधील महाविकास आघाडीच्या विजयानंतर येत्या विधानसभा निवडणुकीत पंढरपूरमध्ये पुन्हा राष्ट्रवादीच येणार अशा पोस्ट करायला सुरूवात केली आहे. या भागात राष्ट्रवादीची ताकद असून पक्षाध्यक्ष शरद पवार यांना मानणारा मतदार आहे. स्व. आमदार भारत भालके यांनी येथे सलग तीन निवडणुका मातब्बरांना पराभूत  करून जिंकल्या होत्या. यामुळे पोटनिवडणुकीत भगीरथ भालके हे विजयी होतील, अशी अपेक्षा होती. मात्र थोडक्या मताने ते पराभूत झाले. त्यांना 1 लाख 5 हजार 717 इतकी मतं मिळाली होती. 

Header
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करणे हा IT Act 2000 नुसार गुन्हा आहे.
Close
Close