नाद करायचा नाय ! यंदा दुष्काळीपट्ट्यात विक्रमी साखर उत्पादन
पंढरपूर – यंदा ऊसपट्टा असणार्या कोल्हापूर व सांगली जिल्ह्यापेक्षा दुष्काळीपट्टा म्हणून ज्याची ओळख आहे त्या सोलापूर व मराठवाड्यात जास्त ऊस उपलब्ध असून एप्रिलच्या मध्यापर्यंत या विभागात 280 लाख मे. टन उसाचे गाळप झाले असून बहुतांश कारखाने अद्यापही सुरू आहेत. तर कोल्हापूर व सांगली भागात मात्र 28 कारखाने बंद झाले असून तेथे 251 लाख मे. टनाचे गाळप पूर्ण झाले आहे.
2021-22 चा गळीत हंगाम हा महाराष्ट्रासाठी विक्रमी मानला जात आहे. देशात सर्वात जास्त साखर राज्यात तयार झाली आहे. महाराष्ट्राचे उत्पादन हे जगात ब्राझील या देशाच्या पाठोपाठ आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात जवळपास 1195 लाख मे. टन ऊस गाळला गेला असून यापासून 124 लाख टनाहून अधिक साखर तयार झाली आहे. मराठवाडा भागात उसाचे क्षेत्र जास्त असल्याने येथील कारखाने सुरूच राहणार आहेत. शेजारच्या सोलापूर जिल्ह्यातील सीमावर्ती भागातील कारखाने मराठवाड्यातील ऊस गाळपासाठी मदत करत आहेत. जवळपास सात कारखान्यातून उस्मानाबाद , लातूर जिल्ह्यातील ऊस गाळपासाठी येत आहे.
वास्तविक पाहता राज्यात सर्वात जास्त ऊस पिकतो तो कोल्हापूर व सांगली भागात. मात्र आता दुष्काळी पट्ट्ा असणार्या सोलापूर व मराठवाड्यात उसाचे क्षेत्र वाढत चालले आहे. मागील सलग तीन वर्षे पावसाने साथ दिल्याने मराठवाडा व सोलापूर भागात मुबलक पाणी उपलब्ध होत आहे. यामुळे उसाचे क्षेत्र वाढत चालले आहे. यातच डाळिंब बागा रोगाला बळी पडत असल्याने शेतकरी ऊसशेतीकडे वळले आहेत. यामुळेच यंदा मराठवाड्यात बंपर उत्पादन झाले असून तेथील साखर कारखाने हे मे अखेरपर्यंत चालणार आहेत.
राज्यात अद्याप ही नव्वद लाख मे. टन ऊस शिल्लक असून यातील 80 टक्के ऊस एकट्या मराठवाड्यातील आहे. यंदाचे साखर उत्पादन हे 135 लाख टन इतके होवू शकते. महाराष्ट्र हा देशात साखर उत्पादन सर्वात अग्रेसर असून मागील दोन वर्षात राज्यात उत्तर प्रदेशलाही मागे टाकले आहे. यावर्षी उत्तर प्रदेशमध्ये आतापर्यंत 93.75 लाख टन साखर उत्पादित झाली आहे.
राज्यात उसाचे क्षेत्र वाढत चालले आहे. यात सोलापूर जिल्हा अग्रणी आहे. येथील डाळिंब बागांच्या जागी आता नगदी पीक असणार्या उसाला शेतकरी प्राधान्य देवू लागला आहे. मागील वर्षी राज्यात 11.3 लाख हेक्टर उसाचे क्षेत्र होते ते यंदा 2021-22 च्या हंगामात 12.3 लाख हेक्टर इतके झाले आहे तर सध्याही अनेक ठिकाणी ऊसलागवडी सुरू असल्याने यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. यातच याही वर्षी चांगल्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असल्याने सर्व प्रकल्प समाधानकारकरित्या भरण्याची शक्यता आहे.
85 लाख टन साखर होतीय निर्यात
इंडियन शुगर मिल्स असोशिएशनच्या म्हणण्यानुसार जागतिक पातळीवरील स्थिती पाहता यंदा भारतातून 85 लाख टन साखर निर्यात होईल. यापैकी 74 लाख टन साखर निर्यातीचे करार पूर्ण झाले आहेत तर सात ते आठ लाख टनाचे करार होण्याची प्रक्रिया सुरू आहे. मार्च 2022 पर्यंत देशातून 57 लाख टन साखर बाहेर पाठविली गेली आहे. चांगला पाऊस, खतांची योग्य मात्रा, चांगल्या वाणांमुळे वाढलेले एकरी उत्पादन यामुळे देशात साखरेचे बंपर उत्पादन होत असल्याचे इस्माचे मतं आहे.