सोलापूर जिल्ह्यात शाळा सुरू करण्याचा निर्णय आठ दिवसांनी घ्यावा,
पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची सूचना
सोलापूर, दि.25: जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. सर्वच विभागांनी कामात सातत्य ठेवावे, कोणत्याही बाबतीत हयगय करू नका. रूग्ण वाढत असल्याने प्रशासनाने शाळा सुरू करण्याचा निर्णय आठ दिवसांनी घेण्याच्या सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिल्या.
नियोजन भवन येथे कोरोनाविषयक आढावा बैठकीत श्री. भरणे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले यांच्यासह विभाग प्रमुख उपस्थित होते.
श्री. भरणे यांनी सांगितले की, शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात रूग्णसंख्या वाढत आहे, कोणीही गाफील राहू नये. पंढरपूर, माळशिरस, बार्शी, करमाळा,माढा या पाच तालुक्यात रूग्णसंख्या वाढत आहे. रूग्णांची लक्षणे सौम्य असली तरी प्रत्येकांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढविण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.
लसीकरणीचा वेग वाढवा
राज्यात कोरोना लसीकरणाबाबत जिल्हा मागे राहता कामा नये. जिल्ह्याला मुबलक प्रमाणात लस मिळू लागली आहे. प्रशासनाने यंत्रणेशी सतत संपर्कात राहून लस उपलब्ध करून घ्यावी. 15 ते 18 वयोगटातील युवकांना कोवॅक्सीन डोस दिला जातो. 2 लाख 26 हजार 412 युवकांपैकी केवळ 69 हजार 673 जणांना देण्यात आला आहे. या डोसची मागणी वेळेत नोंदवून उपलब्ध करून घ्यावे. पहिला डोस 29 लाख 86 हजार 665 नागरिकांना दिला असून 85.4 टक्के लसीकरण झाले आहे. दुसरा डोस 18 लाख 94 हजार 553 नागरिकांनी घेतला असून याची टक्केवारी 55.5 टक्के झाली आहे. यामुळे लसीकरणाचा वेग वाढविण्याच्या सूचनाही पालकमंत्री श्री. भरणे यांनी दिल्या.
तिसऱ्या लाटेबाबत सज्जता
कोरोनाची तिसरी लाट सुरू आहे. याबाबत जिल्हा प्रशासन सज्ज आहे. लाटेची तयारी पूर्ण झाली आहे. 28 हजार 400 बेडची क्षमता वाढविण्यात आली असून औषध साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आला आहे. ऑक्सिजनची तीनपट क्षमता वाढविल्याने कमतरता नसल्याचे जिल्हाधिकारी श्री. शंभरकर यांनी सांगितले.
सध्या 3147 रूग्ण ग्रामीण भागात तर 2169 सोलापूर शहरात असे 5316 कोरोनाचे रूग्ण उपचार घेत आहेत. 24 जानेवारी 2022 रोजी जिल्ह्यात 1334 तपासणी करण्यात आल्या, यापैकी 277 ग्रामीण भागात तर 87 सोलापूर शहरात कोरोनाचे पॉझिटिव्ह रूग्ण आढळले. आठवड्याचा पॉझिटिव्ह दर हा 26.2 टक्के झाला असल्याची माहिती डॉ. जाधव यांनी दिली.
पंढरपूर येथे 32 बालकांसाठी आणि 40 इतरांसाठी, अक्कलकोट येथे 20 बेड आणि सिव्हील हॉस्पिटलमध्ये 42 बेड आयसीयु करण्यात आले असून याचे काम अंतिम झाले आहे, अशी माहिती डॉ. ढेले यांनी दिली.
बैठकीला पोलीस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर, लसीकरण समन्वयक डॉ. अनिरूद्ध पिंपळे, मनपा उपायुक्त धनराज पांडे यांच्यासह अन्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.