भीमा कारखाना : अगोदर बिनविरोधसाठी प्रयत्न मात्र नंतर जोरदार चुरस, रविवारी मतदान
पंढरपूर – मोहोळ, पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील गावे कार्यक्षेत्र असलेल्या भीमा कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा प्रचार आता संपला असून रविवार 13 रोजी मतदान होणार आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सुरूवातीला खूप प्रयत्न झाले मात्र उत्तरार्धात यात मोठी चुरस निर्माण झाली. माजी आमदार प्रशांत परिचारक यांनीही शेवटच्या सभेला उपस्थिती दर्शवित भीमा बचाव परिवर्तन पॅनलसाठी प्रचार केला.
19 हजार सभासद असणारी हा कारखाना विद्यमान अध्यक्ष धनंजय महाडिक यांच्या ताब्यात असून गेली अकरा वर्षे ते या कारखान्याचे चेअरमन आहेत. यंदा ते सलग तिसर्या निवडणुकीत उतरले आहेत. यापूर्वी सन 2000 च्या निवडणुकीत त्यांनी पॅनल लावले होते मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला होता. यानंतर 2006 ला तत्कालीन सत्ताधातरी परिचारक व पाटील यांनी कारखाना बिनविरोध करण्याचे आवाहन केले होते. यास प्रतिसाद देत महाडिक यांनी निवडणूक टाळली होती. मात्र 2011 ला कारखाना निवडणुकीत सभासदांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत सत्तांतर घडविले होते. यानंतर 2016 ची निवडणूक त्यांनी सहज जिंकली होती.
यंदा कोरोनामुळे अगोदरच भीमा कारखान्याची निवडणूक उशिरा जाहीर करण्यात आली. यातच राज्यात अतिवृष्टी झाल्याने जुलै महिन्यात सर्वच सहकारी संस्थांच्या निवडणुका आहे त्या प्रक्रिया स्थितीत थांबविण्यात आल्या. यानंतर पुन्हा ऑक्टोंबरमध्ये याबाबतचा निर्णय झाला 1 नोव्हेंबर पासून थांबलेल्या स्थितीपासून पुढे भीमा कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष खासदार धनंजय महाडिक यांच्याविरोधात माजी आमदार राजन पाटील व प्रशांत परिचारक यांनी पॅनल दिले आहे. दरम्यान या निवडणुकीच्या निमित्ताने पंढरपूर व मोहोळ तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
या निवडणुकीच्या प्रचारात महाडिक गटाने आघाडी घेतली होती. त्यांचा नियोजनबध्द प्रचार सुरू असताना भीमा बचाव परिवर्तन पॅनलने सुरूवातीला युवकांच्या हातात या निवडणुकीची सूत्रं दिली. अजिंक्यराणा पाटील, बाळराजे पाटील यांनी प्रचार सुरू केला व नंतर राजन पाटील, प्रणव परिचारक, उमेश परिचारक यांनी सभांना हजेरी लावली. तर शुक्रवारी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी प्रशांत परिचारक यांनी टाकळी सिंकदरच्या सभेत येत आपला इरादा जाहीर केला.
दुसर्या बाजूला सत्ताधारी खासदार महाडिक गटाला मोहोळमधील राजन पाटील विरोधकांनी पाठिंबा दिला होता तसा पंढरपूर तालुक्यातील परिचारक विरोधकांनीही सहकार्य केले आहे. भगीरथ भालके, कल्याणराव काळे, मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी अगोदरच सभा गाजविल्या असताना शुक्रवारी सुस्ते येथील सभेत विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी हजेरी लावली. गेले आठ दिवस प्रचार मोठ्या प्रमाणात सुरू झाला असून आरोप- प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या आहेत. आता रविवारी मतदान होत असून सोमवारी मतमोजणी होणार आहे.