राजकिय

“एमआयडीसी” बाबत आवताडेंकडून मतदारसंघाचे “समाधान”, सोमवारी पाहणीसाठी अधिकारी येणार !

दरम्यान या महत्वाच्या बैठकीला आमदार समाधान आवताडे यांच्यासमवेत परिचारक विरोधक म्हणून शहरात प्रसिध्द असणारे मनसे नेते दिलीप धोेत्रे उपस्थित होते. यावरून पंढरपूर भागात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आवताडे हे सर्व समावेशक नेतृत्व असून त्यांचे सार्‍याच नेत्यांशी चांगले संबंध आहेत. गेले काही दिवस प्रशांत परिचारक व आमदार आवताडे  समर्थकांमध्ये अनेक कारणांवर वाद होत असल्याची चर्चा रंगत होती. आता एमआयडीसी सारख्या महत्वाच्या प्रश्‍नावर आवताडे यांच्यासमवेत दिलीप धोत्रे मुंबईतील बैठकीत दिसल्याने येथे चर्चेला उधाण आले आहे. मात्र हा प्रश्‍न निकाली लागत असल्याने आनंदाचे वातावरण आहे. 

मुंबई – पंढरपूर तालुक्यात ज्याप्रमाणे हरित क्रांती झाली आहे. याच धर्तीवर युवकांच्या हाताला काम मिळण्यासाठी औद्योगिक क्रांती ही घडावी म्हणून एमआयडीसी चा आग्रह आमदार समाधान आवताडे यांनी धरला होता. आता यास यश येताना दिसत असून आज 15 सप्टेंबर रोजी मंत्रालयात उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या दालनात बैठक घेण्यात आली. सोमवारी 18 सप्टेंबर रोजी औद्योगिक महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी पंढरपूर तालुक्यात येवून जागांची पाहणी करणार आहेत.
यावेळी पंढरपूर येथील एमआयडीसी होण्याचा मार्ग आता मोकळा झाला असून भारतीय जनता पक्षाचे नेते यासाठी  आग्रही आहेत. आमदार समाधान आवताडे यांनी निवडून आल्यापासून मागील वर्षभरात अनेकवेळा मागील महाविकास आघाडी सरकारकडे ही यासाठी आग्रह धरला होता. तर आता राज्यात शिंदे व फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर भाजपाची ही मागणी ही मान्य होताना दिसत आहे. मंत्री उदय सामंत यांनी यास हिरवा कंदील दाखवत तातडीने पाहणी करून अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.
तालुक्यातील रांझणी व कासेगाव भागात जागा उपलब्ध असल्याचे आमदार आवताडे यांनी यापूर्वीच सांगितले होते. आता हे अधिकारी या जागांची पाहणी करतील.  पंढरपूर शहराला जोडणारे रस्ते हे महामार्ग दर्जाचे आहेत. येथे रेल्वे स्थानक आहे तसेच पाणी व वीज मुबलक उपलब्ध आहे. याच बरोबर येथे अनेक अभियांत्रिकी व कौशल्य विकासाची महाविद्यालय आहेत. यामुळे मनुष्यबळ ही उपलब्ध होवू शकते. पंढरपूर हे केवळ यात्रांवर अर्थकारण करणारे शहर असून येथे सर्व सुविधा असतानाही एमआयडीसी आजवर होवू शकलेली नाही. यामुळे येथील तरूण नोकरीसाठी मोठ्या शहरांमध्ये जात आहेत.
भाजपाने पंढरपूरच्या या एमआयडीसीचा प्रश्‍न सोडविण्याचा चंग बांधला असून या बैठकीस माजी मंत्री  आमदार सुभाष देशमुख , नूतन जिल्हाध्यक्ष आमदार सचिन कल्याणशेट्टी, याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप धोत्रे, एमआयडीसीच्या विभागीय अधिकारी बिरजे , पंढरपूरचे तहसीलदार सुशील बेल्हेकर, छावा संघटनेचे अध्यक्ष सागर कदम , प्रताप सिंह कांचन इत्यादी उपस्थित होते..

Header
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close