तिरूपतीच्या धर्तीवर पंढरीच्या दर्शनरांगेत भाविकांना सोयी सुविधा, अधिकार्यांचे शिष्टमंडळ श्री बालाजी देवस्थानची करतयं पाहणी


पंढरपूर, दि.15 – पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी राज्य व परराज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. त्यांना अधिकच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी तिरुपती बालाजी देवस्थान राबवित असलेल्या योजनांची पाहणी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या नेतृत्वाखाली तेथे गेलेल्या शिष्टमंडळाकडून करण्यात आली.
पंढरपूरचा विकास करताना आता वाराणसीच्या धर्तीवर योजना आखल्या जात असून जवळपास बावीसशे कोटी रूपयांचा प्राथमिक आराखडा आखण्यात असून तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सादर करण्यात आला आहे. तसेच याबाबत नुकतीच सोलापूर येथे बैठक झाली. पंढरपूर येथे दर्शनासाठी येणार्या भाविकांना दर्शन रांगेत अनेक तास उभे राहावे लागते. हे पाहता यावर तोडगा शोधण्यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत.

तिरुपती बालाजी देवस्थान येथे दर्शनासाठी दररोज लाखो भाविक येतात. येणार्या भक्तांना या देवस्थानाकडून देण्यात येणार्या सुविधांची प्रत्यक्ष पाहणी व माहिती सोलापूर जिल्ह्यातील अधिकार्यांच्या शिष्टमंडळाने घेतली. यामध्ये दर्शन रांग व्यवस्था व रांगेत देण्यात येणार्या सुविधा, गर्दीच्यावेळी करण्यात येणारे नियोजन, भाविकांच्या सुरक्षेसाठी उपलब्ध यंत्रणा, वैद्यकीय सुविधा, वाहतूक नियोजन, वाहन व्यवस्था, वाहनतळ व्यवस्था, भोजन व्यवस्था, स्वच्छता, दर्शन व्यवस्था आदी विविध सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली. याबाबतची माहिती देवस्थानच्या संबंधित अधिकार्यांकडून घेण्यात आली.
यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्यासमवेत जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, प्रांताधिकारी तथा मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव, जिल्हा प्रशासन अधिकारी आशिष लोकरे, प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे, पंढरपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अरविंद माळी उपस्थित होते.

