कार्तिकी यात्रेत ही लसीकरणाची सोय; पाच ठिकाणी केंद्र
पंढरपूर :- कार्तिकी यात्रेमध्ये पंढरपुरात येणारे भाविक आरोग्यसंपन्न राहावेत, तसेच यात्रा कालावधीत येणार्या भाविकांना उत्कृष्ट व दर्जेदार वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. त्याचबरोबर भाविकांच्या सुविधेसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्रे देखील उभा करण्यात आली असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. अरविंद गिराम यांनी दिली.
कार्तिकी यात्रेच्या कालावधीत आरोग्याची आवश्यक काळजी घेण्यासाठी वैद्यकीय उपजिल्हा रुग्णालय, नगरपालिका तसेच जिल्हा परिषद तालुका आरोग्य विभाग या सर्वांच्या वतीने शहरात ठिकठिकाणी तसेच शहर परिसरातील ग्रामीण भागातही आरोग्य यंत्रणा उभी करण्यात आली आहे. यामध्ये सहा आपत्कालीन मदत केंद्रावर औषधोपचार व प्रथमोपचार केंद्रे आहेत. यामध्ये चंद्रभागा वाळवंट, पत्राशेड , 65 एकर परिसर, पोलीस संकुल, भक्तनिवास, संसर्गजन्य रुग्णालय आणि गोपाळपूरचा समावेश आहे.
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या दर्शन मंडप याठिकाणी पाच बेड्ससह संपूर्ण आरोग्य यंत्रणा तसेच शहरात ठिकठिकाणी रुग्णवाहिका तत्पर आहेत. गर्दीच्या आणि आरोग्य सेवा देण्यासाठी दुचाकी रुग्णवाहिका तयार करण्यात आले आहेत. तर शहरातील उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन बेड, अतिदक्षता विभाग , स्वतंत्र कोरोना रुग्ण विभाग तयार करण्यात आला आहे. तसेच एक फिरते वैद्यकीय पथक नेमण्यात आले असल्याचे डॉ.गिराम यांनी सांगितले.
यात्रेच्या पार्श्वभूमीवर लसीकरण केंद्रेही उभा करण्यात असून यात लोकमान्य विद्यालय, 65 एकर, नगरपालिका शाळा नंबर 7 ,गोपाळपूर, नागरी आरोग्य केंद्र या ठिकाणी सोय करण्यात आली आहे. तसेच लसीकरणाबाबत जनजागृतीही केली जाणारअसल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एकनाथ बोधले यांनी सांगितले
आरोग्यविषयक सर्व नियमांचे पालन करुन भाविकांनी यात्रा पार पाडावी. तसेच लसीकरण मोहिमेस देखील उस्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ.अरविंद गिराम व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले यांनी केले आहे.