जिथे “लालपरी” उभारायची तिथे आता खासगी जीप उभ्या
पंढरपूर दि.12:- कार्तिकी यात्रेसाठी येणाऱ्या व जाणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये. त्यासाठी परिवहन विभागाच्या वतीने खासगी वाहनांची व्यवस्था एसटीच्या तिकीट दरात करण्यात आली आहे. प्रवाशांच्या अडचणीचे निराकरण करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे 24 तास हेल्पलाईन सुरु करण्यात आली असून, यासाठी 0217-2303099 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी अमरसिंह गवारे यांनी केले.
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे पंढरपुरात येणाऱ्या भाविकांची कार्तिकी यात्रेच्या तोंडावर गैरसोय होत आहे. कार्तिकी वारीसाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी परिवहन विभाग पूर्ण क्षमतेन काम करीत असून परिवहन आयुक्त यांच्या आदेशानुसार सोलापूर जिल्हा परिवहन अधिकाऱ्यांच्या वतीने विशेष वाहनांची व्यवस्था पंढरपूर बस स्थानक येथून करण्यात आली आहे. यामध्ये सोलापूर सांगोला, मिरज, कुर्डूवाडी, पुणे, बार्शी, औरंगाबाद अशा ठिकाणी वाहने प्रवाशांना घेऊन जात आहेत. प्रामुख्याने कार्तिकी यात्रेसाठी रेल्वेगाड्यांची संख्या भरपूर असल्याने कुर्डूवाडी , सांगोला, मिरज अशा रेल्वे स्थानकापर्यंत खासगी वाहतूक परिवहन विभागाच्या वतीने केली जात आहे.
खासगी वाहनातून वाहतूक होत असली तरी देखील सुरक्षा आणि परिवहन विभागाचे सर्व नियमांची अंमलबजावणी करूनच वाहतुकीस परवानगी दिली जात आहे. तसेच एसटी बसच्या तिकीट दरा इतकेच प्रवासभाडे आकारण्यात येत आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व बस स्थानकांवर परिवहन विभागाच्या वतीने नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. या अधिकाऱ्यांच्या मार्फत नागरिक तसेच भाविकांची गैरसोय टाळण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच खासगी वाहतुकदारांकडून मनमानी भाडे अकारणी केली जात असेल किंवा काही अडचण असल्यास संबधित नोडल अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असेही परिवहन अधिकारी गवारे यांनी सांगितले.
आपत्तीजनक प्रसंगामध्ये प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी प्रवासी वाहतूक होत असली तरी देखील कोरोना प्रतिबंधक नियमांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. प्रवाशासाठी भाविकांना कोणत्याही प्रकारे त्रास होणर नाही याची दक्षता परिवहन विभागाच्या वतीने घेण्यात आली असल्याचेही सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी गवारे यांनी सांगितले.