सोमवारी विठुनामाच्या गजरात साजरा होणार कार्तिकी एकादशीचा सोहळा, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापूजा
पंढरपूर, – कोरोनामुळे जवळपास वीस महिने सर्वच देवस्थान बंद होती यामुळे वारकरी संप्रदायाचे आराध्यस्थान असणार्या पंढरपूरमध्ये ही यात्रा भरत नव्हत्या. आता संसर्ग कमी झाल्याने यंदाची कार्तिकी वारी भरली असून सोमवारी १५ नोव्हेंबर रोजी एकादशीचा सोहळा भक्तिभावाने साजरा होत आहे. यासाठी पंढरीत वारकरी जमले आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे पहाटे सपत्नीक श्री विठ्ठल व रूक्मिणी मातेची महापूजा करणार आहेत. या यात्रेवर एसटीचा संप व कोरोनाचा परिणाम जाणवत असून कमी भाविक संख्या दिसत आहे.
कोरोनाचे संकट असताना मंदिर बंदच होते. मध्यंतरीच्या काळात ते काही दिवस सुरू झाले मात्र पुन्हा दुसरी लाट आल्याने सर्वच देवस्थान कुलूपबंद झाली होती. आता राज्य सरकारने यात्रा भरविण्यास परवानगी दिली आहे. मात्र येथे देवाचे पदस्पर्श दर्शन बंद असून मुखदर्शन सुरू आहे. कार्तिकीचा सोहळा व्यवस्थित पार पडावा यासाठी शासनाने सर्वतोपरी उपाययोजना आखल्या आहेत. शहरात तीन हजाराहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त असून राज्य राखीव दलाच्या तुकड्या ही तैनात आहेत. यासह आरोग्यावर जास्त लक्ष केंद्रित करण्यात आले असून वारीत ही पाच ठिकाणी कोविड लसीकरण केंद्र भाविकांसाठी सज्ज आहेत. स्वच्छतेसाठी साडेतराशे कर्मचारी काम करत आहेत. भाविकांच्या सोयीसाठी चंद्रभागेत बंधार्यातून पाणी सोडले गेले आहे.
एसटीचा संप आल्याने भाविकांसाठी येथील बसस्थानकात परिवहन कार्यालयाने खासगी गाड्यांची सोय केली आहे. तसेच रेल्वे विभागानेही जादा गाड्या सोडून वारकर्यांची सोय केली आहे. दरम्यान अनेक भाविक पायी दिड्यांसह पंढरीत दाखल झाले आहेत. 65 एकरात त्यांना राहण्याची सोय करण्यात आहे. वाळवंटासह गर्दीच्या ठिकाणी जादा बंदोबस्त तसेच पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून यात्रेवर लक्ष ठेवले जात आहे.
सोमवारी एकादशी दिवशी पहाटे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सपत्नीक श्री विठ्ठल व रखुमाईची शासकीय महापूजा करणार आहेत. त्यांच्यासमवेत पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह अनेक पदाधिकारी व अधिकारी असतील. मंदिरे समितीच्या वतीने तयारी पूर्ण करण्यात आली आहे. सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी मंदिराच्या नियोजनाचा आढावा घेतला आहे. या यात्रेत कोरोनाचे नियम पाळले जावेत यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
वीस महिन्यांनी कार्तिकी यात्रा भरल्याने पंढरपूरच्या व्यापार्यांनाही चांगल्या उलाढालीची आशा आहे. मंदिर परिसर व शहरात विविध ठिकाणी प्रासादिक वस्तूंसह अन्य दुकाने सजली आहेत.