आजोबा-नातवाच्या जीवलग नात्याला फसवणुकीने काळीमा, वृध्दाचे साडेतेरा लाख केले परस्पर लंपास केले, गुन्हा दाखल
पंढरपूर – प्रत्येक आजोबा आपल्या नातवात नेहमी स्वःताला पाहत असतो, म्हणूनच नातवा-आजोबाचे प्रेम अजबच असते. एकवेळ आजोबा आपल्या मुलावर विश्वास ठेवणार नाही पण तो नातवावर नेहमीच डोळे झाकून विश्वास टाकतो. मात्र या अतिशय जीवलग नात्याला काळीमा फासण्याची घटना पंढरपूर तालुक्यातील केसकरवाडीत घडली. आजोबाच्या खात्यातून नातवानेच परस्पर साडेतेरा लाख रूपये काढून लंपास केल्याने शेवटी वृध्द आजोबांना आपल्या नातवाविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करावा लागला आहे.
या प्रकरणी दीपक लक्ष्मण केसकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. यातील माहिती अशी की, केसकरवाडी येथील नामदेव विठ्ठल केसकर यांनी आपली साडेचार एकर जमीन विकली होती. यामधून शिल्लक राहिलेले 22 लाख रूपये त्यांनी विविध बँक व पतसंस्थेमध्ये ठेवले होते. या पैकी साडेपंधरा लाख रूपये त्यांनी तालुक्यातील भाळवणी येथील युनियन बँकेत शिल्लक ठेवले. दरम्यान मागील वर्षी नामदेव केसकर यांनी यामधील दोन लाख रूपये नातू दीपक यास दिले. पुणे येथे राहणारा दीपक हाच आजोबाचे व्यवहार सांभाळत होता. यामुळे त्याने राष्ट्रीय बँकेत कमी व्याजदर मिळत असल्याने खासगी बँकेत पैसे ठेवण्याचा आजोबाला सल्ला दिला. तसेच सांगोला तालुक्यातील एका खासगी बँकेत दुप्पट व्याज मिळत असल्याचे सांगून साडेतेरा लाख रूपये त्या बँकेत भरू असे सूचित केले होते.
यासाठी त्याने आजोबाचे विविध अर्जांवर ठसे देखील घेतले. सदर रक्कम भरल्यानंतर काही महिन्याने आजोबाने दीपक यास व्याजाचे पैसे आणण्यासाठी तगादा लावला परंतु तो टाळाटाळ करत असे. काही दिवसापूर्वी नामदेव केसकर यांच्यावर शस्त्रक्रिया करायची असल्यामुळे त्यांनी दीपकशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचा मोबाईल बंद होता. यामुळे त्यांनी थेट बँकेत जावून चौकशी केली असता त्यांच्या खात्यावर केवळ दोनशे रूपये शिल्लक असल्याचे आढळून आले. मागील तीन ते चार महिन्यापासून दीपक केसकरने कुटुंबाशी संपर्क तोडला असून त्याचा मोबाईल देखील बंद आहे. यामुळे नामदेव केसकर यांनी नातवा विरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.