पंढरपूरसह पाच तालुक्यातील कडक निर्बंधाबाबत लोकप्रतिनिधींशी चर्चेअंती निर्णय :पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती
सोलापूर, दि.6: जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या कमी होत आहे, ही दिलासादायक बाब आहे. मात्र पंढरपूर, माळशिरस, सांगोला, माढा आणि करमाळा तालुक्यात रूग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. यातून जिल्ह्यातील इतर तालुक्यात संसर्ग होऊ नये, यासाठी पाच तालुक्यातील कडक निर्बंधाबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज येथे दिली.
नियोजन भवन येथे कोरोनाविषयक आढावा बैठकीत श्री. भरणे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरूद्ध कांबळे, आमदार राजेंद्र राऊत, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त पि. शिवशंकर, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे आदी उपस्थित होते.
श्री. भरणे यांनी सांगितले की, जिल्ह्यातील ग्रामीण भागात रूग्णसंख्या पुन्हा झपाट्याने वाढत आहे. पॉजिटिव्ह दर 3.6 टक्के झाला आहे. मात्र प्रशासनाने रूग्णसंख्या आटोक्यात ठेवण्यासाठी उपाययोजना कराव्यात. नागरिकांनी काळजी घ्यावी. पाच तालुक्यातील संसर्ग इतर तालुक्यात पसरून फटका बसू नये, यासाठी तिथे कडक निर्बंध आणावे लागणार आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याशी चर्चा करून आणि सर्वांना विश्वासात घेऊ प्रशासनाने त्वरित निर्णय घ्यावा.
म्युकरमायकोसिसचे रूग्ण कमी होत आहेत. केवळ 28 रूग्ण उपचार घेत आहेत, मात्र सतर्कता बाळगा. लहान बालके, कोमॉर्बिड रूग्णांवर लक्ष केंद्रीत करा, अशा सूचनाही श्री. भरणे यांनी दिल्या.
लसीकरणाबाबत जिल्हा मागे राहता कामा नये, यासाठी प्रशासनाने यंत्रणेशी सतत संपर्कात राहून लस उपलब्ध करून घ्यावी. दुसरा डोस घेणाऱ्यांना प्राधान्य देण्याच्या सूचना श्री. भरणे यांनी दिल्या.
शहराबाबतचा प्रस्ताव शासनाला सादर
सोलापूर शहरात रूग्णसंख्या कमी होत आहे. नागरिकांनी सतर्क राहून काळजी घ्यावी. शहरातील व्यापारी संघटनांची मागणी, दुकानदार यांचा विचार केला जाणार आहे. रूग्णसंख्येनुसार शहरातील निर्बंधाबाबतचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मुख्य सचिव यांच्याशी चर्चा करून शिथीलतेचा निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहितीही श्री. भरणे यांनी दिली.
जिल्हा नियोजनमधून मदत
प्रत्येक विभागाने जिल्हा नियोजन समितीमधील प्रस्ताव तत्काळ प्रशासकीय मान्यतेसाठी सादर करावेत. निधीचा खर्च वेळेत करा, योग्य नियोजन करूनच प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना श्री. भरणे यांनी दिल्या.
जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्ह्याचा समतोल विकास साधण्यासाठी मदत करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत सज्जता
संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत जिल्हा प्रशासन सज्ज आहे. लाटेची पूर्व तयारी पूर्ण झाली आहे. बेडची क्षमता वाढविण्यात आली असून औषध साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आला आहे. ऑक्सिजनची कोणतीही कमतरता नसल्याचे जिल्हाधिकारी श्री. शंभरकर यांनी सांगितले.
सध्या 4280 रूग्ण ग्रामीण भागात तर 66 सोलापूर शहरात असे 4346 कोरोनाचे रूग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत शहरात 1433 तर ग्रामीणमध्ये 3158 असे 4591 मृत्यू कोरोनाने झाले आहेत, अशी माहिती अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सोनिया बागडे यांनी दिली.
बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, डॉ वैशंपायन स्मृती वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांच्यासह अन्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.