राजकिय

पंचवार्षिकमधील शेवटची कार्तिकी महापूजा पवार की फडणवीस करणार !

मंदिर समितीची तयारीची बैठक संपन्न

पंढरपूर- कार्तिकी एकादशी गुरूवार, दि. 23 नोव्हेंबर 2023 रोजी आहे. या दिवशी पहाटे 2.20 वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री व मानाचे वारकरी यांच्या हस्ते सपत्नीक श्रीं ची शासकीय महापूजा केली जाणार आहे. मात्र यंदा राज्यात दोन उपमुख्यमंत्री असल्याने कोणाला संधी मिळणार ? यावर चर्चा रंगली आहे. कारण मंगळवारी मंदार समितीची बैठक पार पडली.
सध्या राज्यात तीन पक्षांचे सरकार असून भाजपाचे देवेंद्र फडणवीस व राष्ट्रवादीचे अजित पवार हे दोन उपमुख्यमंत्री आहेत. येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वीची ही पंचवार्षिकमधील शेवटची कार्तिकी यात्रा असणार आहे. यामुळे समितीचे निमंत्रण कोण स्वीकारणार याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.
कार्तिक यात्रा कालावधी 14 ते 27 नोव्हेंबर 2023 असा राहणार आहे. या यात्रा कालावधीत सुमारे 10 ते 12 लाख भाविक येतात. या कालावधीतील श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिराशी संबंधित असलेल्या प्रथा व परंपरांचे पालन करून, भाविकांना आवश्यक व पुरेसा प्रमाणात सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
कार्तिकी यात्रेच्या अनुषंगाने आज मंदिर समितीची 3 ऑक्टोंबर रोजी सकाळी 11 वाजता सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज (औसेकर) यांचे अध्यक्षतेखाली श्री विठ्ठल रूक्मिणी भक्तनिवास, पंढरपूर येथे बैठक संपन्न झाली. बैठकीस सदस्या शकुंतला नडगिरे, भास्करगिरी बाबा, ह.भ.प.ज्ञानेश्वर देशमुख (जळगांवकर), ॲड.माधवी निगडे, ह.भ.प.प्रकाश जवंजाळ, शअतुलशास्त्री भगरे गुरुजी हे समक्ष व ह.भ.प.शिवाजीराव मोरे हे दुरदृष्य प्रणालीद्वारे तसेच कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके व व्यवस्थापक बालाजी पुदलवाड उपस्थित होते.
परंपरेनुसार 16 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 2023 या कालावधीत 24 तास दर्शन, शासकीय महापूजेचे नियोजन, दर्शनरांग व्यवस्थापन, लाईव्ह दर्शन व्यवस्था, आपत्कालिन व सुरक्षा व्यवस्था, देणगी व्यवस्था, निवास व्यवस्था, भाविकांची अपघात विमा पॉलीसी, स्वच्छता व्यवस्था, वैद्यकीय सुविधा, पिण्याचे पाण्याची व्यवस्था, लाडूप्रसाद व्यवस्था, मोफत चहा व खिचडी वाटप व इतर अनुषंगिक व्यवस्था भाविकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
याशिवाय, आषाढी यात्रा 2023 मध्ये उत्कृष्ट सेवा केलेले अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे व विभाग प्रमुख भिमाशंकर सारवाडकर यांच्या अभिनंदनाचा ठराव पारीत करण्यात आला. तसेच मंदिर समितीच्या व्यवस्थापनावरील खर्चदान निधीच्या एकूण उत्पन्नाच्या 10 टक्क्यावरून 25 टक्के करण्याबाबतचा शासनास प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. तसेच समितीकडील सर्व ई निविदा यापूढे शासनाच्या https://mahatenders.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरून मागविण्यात येणार आहेत. त्याची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली असल्याची माहिती राजेंद्र शेळके यांनी दिली.

Header
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close