विशेष

गौरवास्पद : पंढरीच्या सुपूत्राने पोहून पार केली इंग्लिश खाडी !

पंढरपूर, दि. ९- अत्यंत खडतर व शारिरीक, मानसिक कसोटी पाहणारी इंग्लिश चॅनल स्विम अर्थात इंग्लिश खाडी पोहून पार करण्याची मोठी कामगिरी पंढरपूरच्या पंधरा वर्षीय सुपूत्राने पार पाडली असून यामुळे पंढरीचा डंका साता समुद्रापार वाजला आहे.

मूळचे पंढरपूरचे डॉ. शिवानंद जाधव हे सध्या लंडनमध्ये असून त्यांचा पंधरा वर्षीय मुलगा सहिष्णू व त्याच्या साथीदारांनी इंग्लिश खाडी पोहून पार करण्याचा भीम पराक्रम केला आहे. जाधव कुटुंबिय मुळचे पंढरपूरचे असून त्याचे आजोबा ह.भ.प. भाऊसाहेब धोंडोपंत जाधव-भोसेकर हे वारकरी संप्रदायातील आहेत. टाकळी येथे त्यांचे घर असून मोहोळ तालुक्यातील पेनुर येथे वारकरी संप्रदायाचा मठ देखील आहे.

इंग्लिश खाडी ही निसर्गत: अतिशय फसवी आहे. वीजा चमकत पडणारा पाऊस, जेली फिश, डॉल्फिन, सील सारखे मासे, प्रचंड थंड पाणी, यासोबतच अतिशय अनिश्चित लाटांच्या प्रवाहांसाठी आणि सतत बदलणाऱ्या हवामानासाठी ती ओळखली जाते. मोहिमेस प्रारंभ झाल्यानंतर अनेकदा वातावरणात प्रचंड बदल होऊन जलतरणपटूंपुढे मोठे आव्हान उभे राहते. अनेक दशकांपासून जगभरातील जलतरणपटूंच्या शारिरीक क्षमते बरोबर मानसिक सहनशक्तीची परीक्षा या खाडीने घेतली आहे. यामुळेच इंग्लिश खाडी पोहून पार करणे जलतरणपटुंचे स्वप्न असते. सहिष्णू जाधव ने ही कामगिरी पंधराव्या वर्षीच पार पाडली. यामुळे तरूण जलतरणपटुमध्ये त्याचा समावेश झाला आहे. आजवर केवळ ६२ भारतीयांनी इंग्लिश चॅनल यशस्वीरित्या पोहून पार केली आहे.

सहिष्णूचा प्रवास आठ महिन्यांपूर्वी सुरू झाला जेव्हा त्याने हे अवघड आव्हान स्वीकारण्याचा निर्णय घेतला. त्याचे इंग्लिश प्रशिक्षक निक्की पोप आणि ट्रेसी क्लार्क यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने डोव्हर येथे कठोर प्रशिक्षण घेतले. त्यांच्या संघाने महाकाय इंग्लिश चॅनेलच्या थंडगार पाण्यातून ७ सप्टेंबर रोजी पहाटे ३ वाजता पोहण्यास सुरूवात केली. इंग्लंड ते फ्रांस हे सुमारे ४० किलोमीटरचे अंतर त्यांनी १४ तासांमध्ये पूर्ण केले. समुद्रातील भरती आहोटी मुळे कोणीही कधीही एकाच सरळ रेषेत पोहू शकत नाही तर इंग्रजी एस आकारामध्ये पोहावे लागते. त्यानेही कामगिरी पार पडल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी अगदी मराठमोळ्या पद्धतीने त्याचे औक्षण करून अभिनंदन केले.

सहिष्णूने ही कामगिरी पार पाडल्यामुळे त्याच्या पंढरपूर येथील आजोबांनी आनंद व्यक्त केला. तसेच भविष्यात देखील त्याने देशाचे नाव मोठे करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

Header
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close