राज्य

गुजरातच्या धर्तीवर महाराष्ट्रातील शेतकर्‍यांनी साखर कारखान्यात ठेवी ठेवाव्यात : साखर आयुक्त


पंढरपूर – गुजरातच्या साखर कारखान्यामध्ये आठ टक्के व्याज दराने शेतकर्‍यांच्या ठेवी आहेत. आपणही याच धर्तीवर ठेवी ठेवल्या तर कारखान्याला बँकेच्या दारात जाण्याची पाळी येणार नाही.  यासाठी 200 टनापेक्षा जास्त ऊस कारखान्यांना देणार्‍या शेतकर्‍यांनी प्रथम ठेवी  ठेवण्याचा प्रयोग करावा, असा सल्ला राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिला. यावेळचा हंगाम वेळेत संपणार असल्याने शेतकर्‍यांनी ऊसतोड टोळ्यांना अगाऊ पैसे देवू नये, असे आवाहन केले आहे.
माढा तालुक्यातील पिंपळनेर येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचा 22 वा ऊस गाळप हंगाम शुभारंभ गायकवाड यांच्याहस्ते गव्हाणीत मोळी टाकून करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जयंत महाराज बोधले होते. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष आमदार बबनदादा शिंदे, आमदार संजय शिंदे, जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे, उपविभागीय अधिकारी ज्योती कदम, कारखान्याचे उपाध्यक्ष वामन उबाळे, कार्यकारी संचालक एस.एन. दिग्रजे उपस्थित होते.
साखर आयुक्त  गायकवाड म्हणाले, चालू गळीत हंगाम हा फार दिवस चालणार नसून 30 एप्रिल पूर्वी सर्व उसाचे गाळप होणार असल्याने शेतकर्‍यांनी ऊसतोड टोळ्यांना पैसे देऊ नयेत. 40% सबसिडीमधून शेतकर्‍यांनी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून हार्वेस्टर घ्यावेत. चालू गळीत हंगामामध्ये राज्यातील कारखान्यांनी 42 हजार 600 कोटी रुपये एफआरपी शेतकर्‍याच्या खात्यावर जमा केले आहे. एफआरपी दिल्याशिवाय  कारखाना सुरू करण्यास परवानगी नाही, हे धोरण आम्ही सध्या अवलंबले आहे. विठ्ठलराव शिंदे कारखान्याने सहवीज निर्मिती, आसवनी यासारखे प्रकल्प उभा करून इतर कारखान्यासमोर एक आदर्श ठेवलेला असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.
यावेळी बोलताना आमदार बबनराव शिंदे म्हणाले, गतवर्षी साखर निर्मितीच्या निर्णयामुळे चांगल्या पद्धतीने साखर विक्री झाली व 2604  रुपये प्रतिटन उसाला दर दिला आहे. यावर्षी उतारा जास्त असेल तर दर आणखी देऊ.

Header
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close