राजकिय

पंढरपूर बाजार समितीच्या १८ जागांसाठी ११७ उमेदवारी अर्ज, आ. आवताडे समर्थकांसह विठ्ठल परिवार व पाटील गट सक्रिय

पंढरपूर- पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये १८ जागेसाठी विक्रमी ११७ अर्ज दाखल झाले आहेत. या निवडणुकीत सत्ताधारी परिचारक गटासह आमदार आवताडे समर्थक, विठ्ठल परिवार, महाविकास आघाडी तसेच काळे तसेच अभिजित पाटील गटाने अर्ज दाखल केले आहेत.

यामुळे यंदा बाजार समितीची निवडणूक बिनविरोध होण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. दरम्यान बाजार समितीमध्ये परिचारक कुटुंबातील एकाही व्यक्तीने उमेदवारी दाखल केली नाही. या संस्थेत आजवर परिचारक यांनी आपल्या सहकाऱ्यांना संधी देण्याची भूमिका घेतली होती, ती यंदाही कायम ठेवली आहे.

सोमवार ३ रोजी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी विविध पक्ष, गट, संघटना यांनी उमेदवारी दाखल केल्यामुळे सहायक निबंधक कार्यालयात एकच गर्दी झाली होती. सत्ताधारी परिचारक गटासह विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील गट, विठ्ठल परिवार, बळीराजा शेतकरी संघटनासह विविध शेतकर्‍यांनी आपली उमेदवारी दाखल केली आहे. दरम्यान आमदार समाधान आवताडे यांच्या समर्थकांनीही बाजार समितीसाठी अर्ज दाखल केले आहेत.कमीत कमी दहा गुंठे शेती असणारा शेतकरी उमेदवारी अर्ज दाखल करू शकतो असा नवीन नियम करण्यात आल्याने उमेदवारांची सं‘या वाढली आहे.

परिचारक गटाकडून हरिष गायकवाड, दिलीप चव्हाण, राजू गावडे, महादेव बागल, जयसिंग भुसनर, तानाजी पवार, संतोष भिंगारे, हरिभाऊ फुगारे, महादेव लवटे, नागनाथ मोहिते, शिवदास ताड, अभिजीत कवडे, पंडीत शेंबडे, वसंत चंदनशिवे, सचिन कुचेकर, यासिन बागवान, सोमनाथ डोंबे, श्रीमंत डांगे, शारदा अरूण नागटिळक व संजिवनी बंडू पवार आदींनी उमेदवारी दाखल केली आहे. दरम्यान व्यापारी मतदार संघातून केवळ डोंबे व बागवान यांचेच अर्ज दाखल झाले आहेत.

तर मनसेचे नेते दिलीप धोत्रे, विठ्ठल कारखान्याचे माजी अध्यक्ष भगीरथ भालके, सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे आदी नेत्यांनी विठ्ठल परिवारा अंतर्गत एकत्र येत ७० हून अधिक उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी स्वतंत्रपणे सतरा उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी सदर निवडणुकीमध्ये लवचिक धोरण स्वीकारणार असल्याचे सांगत विरोधकांशी हातमिळवणी करणार असल्याचे जाहीर केले आहे. यामुळे विठ्ठल परिवार व परिचारक यांच्यामध्ये युती होणार का याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र अभिजीत पाटील यांची एकला चलो रे भूमिका असल्याचे चित्र आहे. 

Header
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close