राजकिय

माढा लोकसभा : भाजपामध्ये आत्तापासूनच उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरु !



2024 ची निवडणूक जस जशी जवळ येवू लागली आहे तस तशी माढा लोकसभा मतदारसंघात आता भारतीय जनता पक्षात उमेदवारीसाठीची रस्सीखेच वाढू लागली आहे. गतनिवडणुकीत मोहिते पाटील यांनी त्याग करत ही जागा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना दिली व विजयासाठी प्रामाणिक प्रयत्न करत प्रथमच या मतदारसंघात कमळ फुलविण्यास सहकार्य केले. आता मोहिते पाटील ही येणार्‍या निवडणुकीत या जागेवर हक्क सांगू शकतात व सध्याची स्थिती पाहता त्यांची पावले त्याच दिशेने जात आहेत.
खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी येणार्‍या निवडणुकीत पुन्हा उमेदवारी मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू केले असून त्यांचे मतदारसंघात दौरे वाढले आहेत. येथील महत्वाचे प्रश्‍न सोडविण्यासाठी ते सतत धावपळ करत असून पंढरपूर -फलटण रेल्वे मार्गासाठी निधी व मंजुर्‍या,  निरा देवघरचे अतिरिक्त पाणी लाभक्षेत्रात आणणे यासह पंढरपूर व सांगोल्याचा यात समावेश करणे याचबरोबर माढा व करमाळा तालुक्यासाठी पाणी आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. दरम्यान निंबाळकर यांनी मागील काही दिवसात सतत बैठका, दौर्‍यांचा सपाटा लावला असून केंद्रीय मंत्री त्यांच्यासमवेत येथे पाहणी करताना दिसत आहेत. यातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व रेल्वे मंत्री अश्‍विनी वैष्णव यांनी निंबाळकर यांचे जाहीरपणे कौतुक करत त्यांना येथील विकासकामांचे श्रेय दिल्याने सहाजिकच सोलापूर जिल्ह्यात हा चर्चेचा विषय आहे. खा. निंबाळकर हे नवी दिल्लीत पंतप्रधानांपासून ते विविध विभागाच्या मंत्र्यांना भेटून मतदारसंघासाठी निधी तसेच विकासकामांची मागणी करत आहेत.
माढा लोकसभा मतदारसंघ 2019 मध्ये जिंकताना विजयसिंह मोहिते पाटील यांचे मोठे सहकार्य भाजपाला झाले होते. माळशिरस तालुक्यात विक्रमी मताधिक्क्य निंबाळकर यांना दिले होते. मागील निवडणुकीत आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, धैर्यशील मोहिते पाटील, जयसिंह मोहिते पाटील यांचा निंबाळकर यांच्या विजयात मोलाचा वाटा होता. या मतदारसंघातील फलटण रेल्वे सह निरा देवघर सिंचन प्रकल्पासाठी मोहिते पाटील यांचेही योगदान आहे. अनेक वर्षे त्यांनी संघर्ष केला आहे. गेल्या काही दिवसात येथील विकासकामांवरून श्रेयवादाचे राजकारण ही माढा मतदारसंघाने पाहिले आहे. दरम्यान माढा लोकसभेसाठी मोहिते पाटील हे 2024 ला प्रबळ दावेदार असणार हे निश्‍चित आहे. ते उघडपणे मागणी करत नसले तरी त्यांचे करमाळ्यापासून ते फलटण पर्यंत काम सुरूच आहे.

Header
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close