माझ्यावर खुशाल आरोप करा मात्र बॅंकेवर टीका करू नका : प्रशांत परिचारकांचा विरोधकांना सल्ला
पंढरपूर- पंढरपूर अर्बन बँक ही शंभर वर्षाहून वर्षापासून कार्यरत आहे. नागरिकांचा विश्वास व आर्थिक आधार म्हणून या संस्थेकडे बघितले जाते. यामुळे या बँकेवर टीका न करता माझ्यावर वैयक्तिक राग असेल तर खुशाल आरोप करा असा टोला माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी बँकेच्या निवडणुकी संदर्भात आयोजित बैठकीमध्ये विरोधकांना लगावला.
दी पंढरपूर अर्बन को.ऑप.बँकेची निवडणूक जाहीर झाली असून या संदर्भात विचार विनीमय करण्यासाठी येथील पांडुरंग भवन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जेष्ठ नेते दिनकर मोरे, दाजी भुसनर, बाजार समितीचे सभापती दिलीप घाडगे, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट, माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, सोमनाथ भिंगे, लक्ष्मण धनवडे, रजनीश कवठेकर, बाबासाहेब बडवे यांच्यासह डॉक्टर, वकील व सामाजिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
अर्बन बँकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर विरोधकांनी समविचारी आघाडी स्थापन केली असून बँकेबाबत विविध आरोप प्रत्यारोप केेले जात आहेत. यावर प्रशांत परिचारक यांनी विरोधकांचे नाव न घेता त्यांच्या आरोपांना उत्तर दिले.
पुढे बोलताना परिचारक यांनी, कोविड महामारीमुळे रस्त्यावरील टपरीचालका पासून जगातील सर्वात मोठ्या आर्थिक महासत्ता असणार्या देशांना देखील फटका बसला. देशभरातील बँकाची कर्ज थकीत होती. मात्र याचा अर्थ असा होत नाही की बँक डबघाईस आली आहे. पंढरपूर अर्बन बँकेत सव्वा लाख खातेदारांचे पैसे असून त्यांचा बँकेवर ठाम विश्वास आहे. या विश्वासाला स्मरूनच आम्ही आज पर्यंत काम करीत आलो आहोत. प्रथम बँकेचे हित हा मंत्र आम्हाला स्व.सुधाकरपंत परिचारक यांनी दिला असून त्यांच्या वाटेवरच काम करीत असल्याचे परिचारक यांनी सांगितले.
दरम्यान यावेळी तीसहून अधिक जणांनी बँकेची उमेदवारी मिळावी म्हणून इच्छा व्यक्त केली. तसेच सर्व जेष्ठ नेते, पदाधिकारी यांनी प्रशांत परिचारक यांना उमेदवारीबाबत सर्व अधिकार दिले.