भीमात महाडिक विरुध्द पाटील असाच सामना रंगला !
मोहोळ तालुक्यातील टाकळी सिंकदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक अत्यंत गाजत असून सत्ताधारी महाडिक गटाचा बिनविरोधचा प्रस्ताव विरोधकांनी नाकारला व येथे भीमा बचाव परिवर्तन पॅनल उभे केले आहे. दरम्यान या निवडणुकीत माजी आमदार राजन पाटील यांचा गट ताकदीने उतरला असला तरी पंढरपूरच्या प्रशांत परिचारक यांनी मात्र या निवडणुकीबाबतची आपली भूमिका स्पष्ट केलेली नसल्याने संभ्रम आहे. सध्या सत्ताधारी व विरोधकांनी प्रचाराला जोरदार सुरूवात केली आहे. या कारखान्यासाठी मोहोळ, पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील गावांचे कार्यक्षेेत्र आहे.
भीमा कारखाना हा विद्यमान भाजपा राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांच्याकडे गेल्या अकरा वर्षापासून आहे. तत्पूर्वी स्व. सुधारकपंत परिचारक व राजन पाटील यांची सत्ता होती. या कारखान्याची उभारणी खा. महाडिक यांचे वडील स्व. भीमराव महाडिक यांनी केली होती. मात्र नंतर प्रशासक म्हणून तेथे गेलेल्या स्व. सुधाकरपंत परिचारक यांनी निवडणुकीत येथे सत्ता मिळविली. जवळपास पंचवीस वर्षे कारखाना त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालत होता. नंतरच्या काळात धनंजय महाडिक यांनी आपल्या वडिलांनी उभारलेल्या या कारखान्याला ताब्यात घेण्यासाठी निवडणुका लढविल्या. सन 2000 मध्ये त्यांना अपयश आले तर 2006 मध्ये कारखाना बिनविरोध करण्याच्या तत्कालीन सत्ताधार्यांच्या विनंतीला त्यांनी मान दिला. मात्र 2011 मध्ये निवडणुकीत सत्तांतर घडविले.
महाडिक यांनी सलग दोन निवडणुका जिंकल्या असून आता तिसर्यांदा त्यांचे पॅनल रिंगणात आहे. 2016 च्या निवडणुकीनंतर परिचारक गटानेही या कारखान्यात फारसा रस दाखविला नाही. परिचारकांचा पांडुरंग व नंतर युटोपियन हे दोन्ही कारखाने चांगले चालत आहेत. याच काळात राजन पाटील यांचाही लोकनेते साखर कारखाना उभा राहिला. ही निवडणूक कोरोनामुळे एक वर्षे पुढे गेली तर मध्यंतरी झालेल्या अतिवृष्टीमुळे काही दिवस निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती. कारखाना बिनविरोध करा, असे आवाहन खासदार महाडिक यांनी केले होते. मात्र विरोधकांनी ते धुडकावत 15 ही जागांवर उमेदवार दिले आहेत. महाडिक व परिचारक हे भाजपामध्येच काम करत असल्याने व महाडिक यांचे देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील यांच्याशी असलेले अत्यंत जवळचे संबंध पाहता परिचारक या निवडणुकीत उघडपणे दिसत नसल्याची चर्चा आहे. दामाजी कारखान्यात परिचारकांनी स्वपक्षीय आमदार समाधान आवताडे यांना विरोध केला होता. यानंतर बराचा वाद वाढला होता. याबाबत वरिष्ठांकडे तक्रारी झाल्या होत्या. यामुळेच माजी आमदार प्रशांत परिचारक हे या कारखाना निवडणुकीत सक्रियपणे उतरले नसावेत अशी चर्चा आहे. यातच नुकताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पंढरपूर दौरा झाला आहे. त्यांनीही काही कानपिचक्या दिल्या असाव्यात असे दिसते.
या निवडणुकीसाठी महाडिक यांच्या भीमा विकास शेतकरी पॅनल व विरोधकांच्या भीमा बचाव परिवर्तन पॅनलने मोहोळ तालुक्यातील वडवळ येथील प्रसिध्द श्री नागनाथ देवस्थानात नारळ फोडून प्रचार सुरू केला आहे. राजन पाटील हे उद्यापासून प्रचारात सक्रिय होत आहेत तर त्यांचे चिरंजीव बाळराजे व अजिंक्यराणा पाटील यांनी प्रचाराची धुरा सांभाळली आहे. त्यांच्याबरोबर दिलील घाडगे, कल्याणराव पाटील यांच्या सारखे नेते आहेत. तर महाडिक यांना जनहित शेतकरी संघटनेचे नेते प्रभाकरभैय्या देशमुख, राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटील, भाजपाचे संतोष पाटील, विजयराज डोंगरे, माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर यांचा पाठिंबा आहे.