राजकिय

पंढरीत मुख्यमंत्री शिंदेंभोवती भाजपाचाच गोतावळा, तर स्थानिक शिवसेना पदाधिकारी ठाकरेंच्या पाठीशी !

प्रशांत आराध्ये
पंढरपूर – शिवसेनेतील चाळीस व अपक्ष दहा आमदारांना सोबत घेवून राज्यात सत्तास्थापन करत भाजपाला बरोबर घेणार्‍या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आषाढीच्या महापूजेसाठी पंढरपूरचा दौरा केला. मात्र यावेळी येथील शिवसेनेतील अनेक मातब्बर पदाधिकार्‍यांनी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी आपण असल्याचे दाखवून देत सोलापूरमध्ये आयोजित मेळाव्यात भाग घेतला व ठाकरेंचे नेतृत्व मान्य केले. तर पंढरपूरमध्ये मुख्यमंत्री शिंदे यांच्याबरोबर भारतीय जनता पक्षातील नेतेच जास्त दिसत होते.
येथे एकनाथ  शिंदे गटातील काही शिवसेनेतील पदाधिकार्‍यांनी एक मेळावा आयोजित केला होता. जो राज्यातील शिंदे गट शिवसेनेचा पहिला मेळावा म्हणून संबोधला गेला. याचे आयोजन महेश साठे व सहकार्‍यांनी केले होते. यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित राहिले व त्यांनी भाषणही केले. यास आमदार तानाजी सावंत यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. याचवेळी सोलापूरमध्ये ठाकरे समर्थक शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी मेळावा घेत आपण पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यासमवेत असल्याचे सांगितले. यावेळी  साईनाथ अभंगराव यांच्यासह जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, ग्रामीणचे जिल्हाप्रमुख गणेश वानकर, पंढरपूरचे जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, माढ्याचे जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे, माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारे, दीपक गायकवाड, प्रा. अजय दासरी, शहर प्रमुख गुरुशांत धुत्तरगावकर, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख अस्मिता गायकवाड, प्रताप चव्हाण, भीमाशंकर म्हेत्रे यांच्यासह जिल्हाभरातील पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंढरपूर दौर्‍यावर आले असता त्यांच्यासमवेत भाजपाचे अनेक नेते दिसत होते. त्यांचे विश्रामगृहात स्वागत आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी केले होते. तर एकादशी दिवशी त्यांच्या सर्वच कार्यक्रमांना भाजपाचे नेते उपस्थित होते. यात खासदार जयसिध्देश्‍वर महास्वामी, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, माजी मंत्री सुभाष देशमुख यांच्यासह अनेकांचा समावेश होता. मुख्यमंत्री शिंदे हे प्रशांत परिचारक यांच्या पंतनगर येथील कार्यक्रमास ही उपस्थित राहिले होते. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना ते चार वर्षे या पंतनगर येथील कार्यक्रमांना आषाढी दशमी अथवा एकादशीला हजेरी लावत असत. यंदा शिवसेनेच्या शिंदे गटाचे मुख्यमंत्री असणारे  एकनाथ शिंदे येथे उपस्थित राहिले.
शिंदे गट आता विस्तारत असून त्यांचे प्राधान्य मुंबई व आजुबाजूच्या भागात आहे. तेथील अनेक शिवसेनेतील नगरसेवक, पदाधिकार्‍यांनी एकनाथ शिंदे यांचे समर्थन केले आहे. आता हळूहळू ते ग्रामीण भागातही आपले काम सुरू करतील. येथील शिवसेनेचे नेतृत्व आमदार डॉ.तानाजी सावंत हे करत होते. ते आता शिंदे गटात सहभागी झाले असल्याने मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍याच्यावेळी सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेत काय घडणार? याकडे सार्‍या राज्याचे लक्ष लागले होते.
 

Header
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करणे हा IT Act 2000 नुसार गुन्हा आहे.
Close
Close