विशेष

उजनीच्या पाण्याने पंढरपुरातील जुना दगडी पूल पाण्याखाली, प्रशासनाकडून भीमेकाठी सतर्कतेचा इशारा

पंढरपूर (दि.11):- नीरा व भीमा नदीच्या खोऱ्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे उजनी धरणात क्षमतेपेक्षा जास्त पाणीसाठा झाला असल्याने उजनी धरणातून भीमा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे भीमा नदीकाठच्या नागरिकांनी सावधानता बाळगावी . तसेच संभाव्य पूर परिस्थितीमुळे निर्माण होणाऱ्या आपत्तीजनक परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याची माहिती प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी दिली. दरम्यान पंढरीत नदी २५ हजार क्युसेकने वाहात असल्याने जुना दगडी पूल पाण्याखाली गेला आहे.

उजनीतून ४० हजार क्युसेकने पाणी सोडले जात आहे. याचबरोबर वीरमधूनही ४८०० क्युसेकने पाणी सोडले जात होते. आता वीरमधून पाणी सोडणे बंद झाले आहे. सोडलेल्या पाण्यामुळे भीमा दुथडी भरून वाहात आहे. उजनी धरण १०९.६८ टक्के भरले आहे.
संभाव्य आपत्तीजनक परिस्थितीचा सामना करण्यासाठी गांवनिहाय नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यामध्ये प्रत्येक गावची लोकसंख्या, शाळा-कॉलेज, मंगल कार्यालय, रुग्णालय , वैद्यकीय अधिकारी. खासगी दवाखाने, आरोग्य केंद्रे, जनावरांचे दवाखाने, सेवाभावी संस्था, पोहणारे व्यक्ती, औषध दुकाने यांची माहिती संकलित करण्यात आली आहे. धान्य वितरण व गॅस वितरण व्यवस्थेबाबत नियोजन करण्यात आले आहे. वीज वितरण विभागाकडून नदी काठचे वीज वाहक खांब तसेच रोहित्र सुरक्षित स्थळी लावण्यात आले आहे. औषधसाठा मुबलक उपलब्ध राहिल याची दक्षता घेण्याच्या सूचना आरोग्य विभागाला देण्यात आल्या असल्याचेही प्रांताधिकारी गुरव यांनी सांगितले.
चंद्रभागा नदी पात्रात येणाऱ्या वारकरी व भाविकांना नगरपालिका प्रशासनाकडून ध्वनीक्षेपनाव्दारे वेळोवेळी सूचना देण्यात येत आहेत. पूरपस्थितीत बोट व्यवस्था, लाईफ जॅकेट, लाईफ रिंग, तसेच स्वयंसेवक व स्वयंसेवी संस्थाची पथके तयार करण्यात आली आहेत. अतिवृष्टी व पूरपरिस्थितीवेळी नदीपात्रात सोडण्यात येणाऱ्या विसर्गाबाबत पाटबंधारे विभागाने आवश्यक नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्याचेही प्रांताधिकारी गुरव यांनी सांगितले.
आपत्कालीन परिस्थितीमध्ये ग्रामस्थांनी प्रशासनाला सहकार्य करावे तसेच आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहनही प्रांताधिकारी गुरव यांनी केले आहे.

Header

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करणे हा IT Act 2000 नुसार गुन्हा आहे.
Close
Close