राज्य

ग्रामीणमधील रस्त्यासाठी भाजपा आमदारांचे आणखी एक आंदोलन, पंढरीतील मार्गांची दुर्दशा ही एकदा पाहा साहेब

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी खास बाब म्हणून पंढरपूरला जोडणारे सर्व रस्ते महामार्गाच्या दर्जाचे बनविले आहेत. त्यांचा या महिना अखेर पंढरपूर दौरा होत असून ते पालखी महामार्गावरील वाखरी ते पंढरपूर या मार्गाला मंजुरी देतील असे दिसत आहे. एका बाजूला गडकरी केंद्रातून निधी देवून येथील रस्ते तयार करत असताना राज्य सरकार मात्र दुर्लक्ष करत असल्याचे दर्शविण्यासाठी कदाचित ही आंदोलन होत असतील अशी चर्चा आहे.

पंढरपूर-  पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत विजय मिळविल्याने भारतीय जनता पक्षाचे मनोधैर्य उंचावले असून येथील विधानपरिषदेचे प्रशांत परिचारक व विधानसभेचे आमदार समाधान आवताडे यांची सध्या चांगलीच क्रेझ आहे. या दोन्ही लोकप्रतिनिधींनी आता जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी कंबर कसली असून ते यासाठी आंदोलन करत आहेत. तिर्‍हे मार्गे सोलापूरच्या रस्त्यानंतर आता सांगोला रस्त्यावर चौथा मैल येथे रास्ता रोको उद्या रविवारी 17 ऑक्टोंबरला होणार आहे.
परिचारक हे विधानपरिषदेचे जिल्ह्याचे आमदार आहेत तर आवताडे हे पंढरपूर- मंगळवेढ्याचे लोकप्रतिनिधी आहेत. त्यांनीच आंदोलन हाती घेतल्याने आता जनतेने आपल्या मागण्या यापुढील काळात आमदारांना सांगायच्या की थेट या लोकप्रतिनिधींप्रमाणेच आंदोलन करायचे ? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. कारण आमदारांनी शासनाच्या मागे लागून कामे पूर्ण करणे अपेक्षित असताना कदाचित सरकारकडून या आमदारांना प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांच्यावरही आंदोलनाची वेळ आली आहे. काहीच दिवसापूर्वी मोहोळ तालुक्यातील टाकळी सिंकदरच्या चौकात रस्त्यासाठी या आमदारांनी आंदोलन केले होते.
दरम्यान सांगोला रस्ता तयार झाला असला तरी वन विभागाच्या हद्दीतून जाणार्‍या रस्त्याची अवस्था दयनीय आहे. शासन व वन विभागात समन्वय नसल्याचा ठपका ठेवत हे आंदोलन हाती घेण्यात आले आहे. दरम्यान ज्या प्रमाणे पंढरपूर तालुक्यासह ग्रामीण भागात अनेक ठिकाणी रस्ते खराब आहेत तशीच अवस्था या तीर्थक्षेत्र शहरातील आहे. अनेक प्रमुख रस्ते असोत की प्रदक्षिणा मार्ग हे सतत तयार केले जातात मात्र ते लगेचच खराब होतात. नवीन पुलावरील रस्त्याची तर दुर्दशा झाली आहे. याकडे ही आमदारसाहेबांनी पाहावे व याची दुरूस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

Header

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close