पाटील व काळे यांच्या कारखान्यातील गळीत हंगामाचा रविवारी सहकारमंत्र्यांच्या उपस्थितीत शुभारंभ
पंढरपूर- सहकारमंत्री बाळासाहेब पाटील हे सोलापूर जिल्हा दौर्यावर येत असून ते रविवारी उद्योजक अभिजित पाटील यांनी चालविण्यासाठी घेतलेल्या सांगोला सहकारी व पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील राष्ट्रवादीचे नेते कल्याणराव काळे यांच्या सहकार शिरोमणी कारखान्यात गळीत हंगामाचा शुभारंभ करणार आहेत. दरम्यान सांगोला कारखाना अनेक वर्षांपासून बंद होता तो आता सुरू होत आहे.
रविवार 17 रोजी सकाळी 11 वाजता सहकारमंत्री बाळासाहेब पाटील हे सांगोला तालुक्यातील वाकी शिवणे येथील सांगोला कारखान्याच्या गळीत हंगाम प्रारंभाच्या कार्यक्रमास हजेरी लावणार आहेत हा कारखाना अभिजित पाटील यांनी चालविण्यास घेतला असून तो आता धाराशिव कारखाना युनिट नंबर चार या नावाने ओळखला जात आहे. पाटील हे पंढरपूरचे उद्योगपती आहेत. या कारखान्याने जवळपास एक तप म्हणजे बारा वर्षे बंद अवस्थेत काढले आहेत. मात्र विक्रमी वेळेत याचे काम पूर्ण करून याच हंगामात पाटील यांनी तो सुरू केला आहे.
रविवारी दुपारी दीड वाजता सहकारमंत्री बाळासाहेब पाटील हे पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रमास हजेरी लावणार आहेत. हा कारखाना राष्ट्रवादीचे स्थानिक नेते कल्याणराव काळे यांचा आहे.