राज्य

पंढरपूरच्या पुंडलिकनगरमधील घरफोडी उघडकीस आणण्यात पोलिसांना यश, सव्वादोन लाखांचा ऐवज जप्त तर दोन सराईत आरोपींना पकडले

पंढरपूर-  शहरातील रेल्वे स्टेशनजवळ असणार्‍या पुंडलिक नगरमधील गोविंद रघुनाथ सबनीस यांच्या घरी झालेली घरफोडी उघडकीस आली असून दोन सराईत आरोपी जेरबंद करण्यात आले आहेत. त्यांच्याकडून सोन्याचे दागिने, चांदीचे शिक्के व वस्तू असा सुमारे सव्वादोन लाखांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने केली आहे. दीपक महादेव थोरात (वय 35, रा. करवडी, ता. कराड) व दादासाहेब ऊर्फ दत्ता नाथा कांबळे (वय 28, रा. येवती, ता. कराड) अशी अटक केलेल्या दोन संशयित चोरट्यांची नावे आहेत. 28 ते 30 जून दरम्यान गोविंद रघुनाथ सबनीस (रा. पुंडलिक नगर रेल्वे स्टेशन, पंढरपूर) यांच्या बंद घराचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने, चांदीचे शिक्के, रोख रक्कम, मोबाइल असा एकूण 1 लाख 18 हजार 600 रुपयांचा ऐवज चोरीस गेला होता. त्यांच्या फिर्यादीवरून पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल झाला होता.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कराड शहरातील एसटी स्टॅन्डसमोरुन दोन सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेतले. त्यांची अधिक चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली. तसेच त्यांनी मागील काही महिन्यांपूर्वी पंढरपूर शहरात घरफोडी केल्याचे सांगत असून त्यांनी चांदीचा ताट व समई चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेले सोन्याचे नेकलेस, सोन्याचे टॉप्स, इतर सोन्याचे दागिने व चांदीचे शिक्के, समई, चांदीचा ताट असा एकूण सव्वादोन लाखांचा ऐवज जप्त केला आहे. पकडलेल्या इसमांपैकी एका इसम हा सांगली व सातारा जिल्ह्यातील रेकॉर्डवरचा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरूध्द इस्लामपूर, सांगली, कराड येथे गुन्हे दाखल आहेत. सदर आरोपींना पंढरपूर शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले असून त्यांच्याकडून अधिक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक सातपुते, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे, सहायक फौजदार खाजा मुजावर, पोलीस हवालदार नारायण गोलेकर, धनाजी गाडे, मोहन मनसावाले, धनराज गायकवाड, अक्षय दळवी, समीर शेख यांनी केली आहे.

Header

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close