पंढरीतील व्यापारी म्हणतात , शुक्रवारी संचारबंदीत दुकानं उघडून सविनय कायदेभंग करणार…!
पंढरपूर – कोरोनाची वाढती संख्या पाहता पंढरपूरसह पाच तालुक्यात जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध उद्या शुक्रवार 13 ऑगस्ट पासून लागू करण्याचा निर्णय घेतला होता. यास पंढरपूरसह इतरत्र व्यापारी महासंघाने विरोध केला होता. याबाबत पंढरपूरचे विविध क्षेत्रातील मान्यवर व जिल्हाधिकारी यांची बैठक सोलापूरला संपन्न झाली व यात दहा दिवस कडक निर्बंध लागू करण्यात येतील असे सांगण्यात आले. याबाबतचे आदेश यापूर्वीच जिल्हाधिकारी यांनी जारी केले आहेत. याबाबत पंढरपूरमध्ये व्यापारी महासंघ व विविध राजकीय ,सामाजिक संघटनांची रात्रो बैठक झाली यात कोणत्याही परिस्थितीत शुक्रवारी दुकाने उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती महासंघाचे अध्यक्ष सत्यविजय मोहोळकर यांनी दिली.
सोलापूरच्या प्रशासनाच्या बैठकीनंतर पंढरीत लक्ष्मीनारायण भट्टड यांच्या दुकानासमोर व्यापारी महासंघाची बैठक झाली यात दुकाने उघडी ठेवण्याचा आग्रह व्यापारी बांधवांनी केल्याची माहिती मोहोळकर यांनी दिली. यासाठी गेले काही दिवस व्यापारी आंदोलन करीत आहेत.
कोरोनामुळे सततच्या संचारबंदीमुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. यासाठी तीन दिवस आंदोलन झाले आहे. यावेळी दिलीप धोत्रे ,लक्ष्मनारायण भट्टड, संतोष कवडे, पांडबा बापट, द्त्तासिंह राजपूत, विनोदराज लटके यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.