जिल्ह्यात एकाचवेळी 75 हजार विद्यार्थ्यांनी गायले राष्ट्रगीत , भोसे येथे “आझादी का अमृतमहोत्सव” साजरा
पंढरपूर – तालुक्यातील भोसे येथील यशवंत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे जिल्हास्तरीय राष्ट्रगीत गायन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील 1028 ग्रामपंचायतीमधील 75 हजार विद्यार्थ्यांनी एकाच वेळी राष्ट्रगीत गाऊन स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला.
भोसे येथे यशवंत विद्यालयाचे मैदानावर राष्ट्रगीत गायन घेण्यात आले. याप्रसंगी सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतल जाधव , गटविकास अधिकारी प्रशांत काळे, सरपंच अॅड. गणेश पाटील, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, प्राचार्य दादासाहेब गाडे, रूपाली स्वामी , जयवंत गावंधरे, उपसरपंच भारत जमदाडे, नागनाथ काळे, ग्रामसेवक डी. बी. भुजबळ उपस्थित होते.
स्फूर्तिगीते, देशभक्तीपर गाण्यांनी संपूर्ण गावात देशभक्तीपर वातावरण तयार झाले होते. या निमित्ताने विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य योध्द्यांच्या वेषभूषा केल्या होत्या. ढोल, ताशा आणि लेझीम हे खेळ येथे सुरू होते. रंगीबेरंगी फुगे यावेळी लावण्यात आले होत तर विद्यार्थ्यांनी मानवी साखळी करत आझादीचा अमृत महोत्सव हे नाव चितारले होते. मैदानावर भारताचा नकाशा रेखाटण्यात आला होता. कोरोना नियंमांचे पालन करत स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल महोत्सव साजरा करण्यात आला.
या उपक्रमा अंतर्गत स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त सोलापूर जिल्हयात 75 हजार विद्यार्थी सामूहिक राष्ट्रगीत गायनात एकाचवेळी सहभागी झाले होते. माझी वसुंधरा योजना व स्वच्छतेसाठी 7 हजार 500 वसुंधरा दूत सक्रिय करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली. यावेळी वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी लोकवर्गणीतून खरेदी केलेल्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण ह.भ.प. देहुकर महाराज यांचे हस्ते करणेत आले.
भोसे ग्रामपंचायतीने स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला असून गावात सर्वत्र बंदिस्त गटार आहेत. पर्यावरण पोषक शाळा, लोकसहभागातून जलसंधारणाचे कामे हाती घेऊन बांबू व वृक्षलागवड केली असल्याचे सरपंच गणेश पाटील सांगितले.तसेच गावासाठी आरोग्य केंद्राची इमारत मंजूर करण्याची मागणी केली.