आता कोरोना लसीकरणला होणार ‘उमेद’ची मदत
१० दिवसात १०० टक्के लसीकरणचा संकल्प
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे आवाहन
सोलापूर, दि.१६: जिल्ह्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला थोपविण्याची जोरदार तयारी जिल्हा प्रशासन करीत आहे. ज्यांनी एकही कोरोनाचा डोस घेतला नाही, अशांचे मनपरिवर्तन आणि त्यांना लस घेण्यास प्रवृत्त करण्यासाठी आता ‘उमेद अभियान’च्या स्वयंसहाय्यता महिला गटांची मदत घेण्यात येणार आहे. त्यांना लोकांना प्रवृत्त करण्याची जबाबदारी दिली असून येत्या १० दिवसात संपूर्ण जिल्ह्यात १०० टक्के लसीकरण करण्याचा संकल्प असून यासाठी या गटांच्या महिलांनी मदत करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले. उमेदच्या माध्यमातून लसीकरण जागृती हा देशातील पहिलाच प्रयोग ठरणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यात कोरोना लसीकरणपासून वंचित असलेल्या नागरिकांना प्रवृत्त करण्यासाठी प्रत्येक गावातील स्वयंसहाय्यता गटांच्या महिलांची मदत होणार आहे. यानिमित्ताने मार्गदर्शन करण्यासाठी आणि त्यांची मते जाणून घेण्यासाठी ऑनलाईन बैठक घेण्यात आली. त्यावेळी जिल्हाधिकारी श्री.शंभरकर बोलत होते. ऑनलाईनद्वारे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, उमेदच्या जिल्हा अभियान व्यवस्थापक मीनाक्षी मडवळी, आयुषचे जिल्हा अधिकारी डॉ. विलास सरवदे, वैश्यपायन स्मृती वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉ अग्रजा वनेरकर, जिल्ह्यातील गटाच्या प्रमुखआणि गट प्रेरीका सामील झाल्या होत्या.
जिल्हाधिकारी श्री शंभरकर यांनी सांगितले की, दोन वर्षात आरोग्य विभाग अहोरात्र काम करतोय. त्यांची मदत करणे गरजेचे आहे. प्रत्येकाने दोन-तीन जणांना प्रवृत्त करावे, अडचणी आम्ही सोडवू. ४८ लाख नागरिकांना पहिला आणि दुसरा डोस दिला आहे, यामध्ये एकाचाही मृत्यू झाला नाही. लसीने केवळ एक-दोन दिवस कणकण येते, बाकी त्रास नसल्याचे पटवून द्या. लस घेतली नसलेल्या व्यक्तीला समुहाने जाऊन त्यांच्याशी प्रत्यक्ष बोला समजावून सांगा.
तुमच्या सहभागामुळे राहिलेल्या नागरिकांचे लसीकरण होण्यास मदत होणार आहे. प्रत्येक स्वयंसहाय्यता महिला गटाने ज्यांना प्रवृत्त करून कोरोना लस दिली, त्याच्यासोबत सेल्फी काढून ग्रुपवर टाकावा, त्यांचा सन्मान करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
श्री. स्वामी म्हणाले, सामाजिक जबाबदारी म्हणून लसीकरण करून घ्यावे. जिल्ह्यात २६ हजार गट आहेत, त्यामध्ये सुमारे दीड लाख महिलांचा प्रत्यक्ष संबंध येतो. आपल्या परिसरातील पाच लोकांना प्रत्येकांनी तयार करावे. ‘इच वन… व्हसीनेट टेन वन’ ही मोहीम यशस्वी होण्यासाठी योग्य नियोजन करावे.
लाखो लोकांनी लस घेतली असून ती सुरक्षित असल्याचे पटवून द्या, खरी उमेद येण्यासाठी लसीकरण करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
श्रीमती पवार म्हणाल्या, बचत गटाची चळवळ आहे, या चळवळीने १०० टक्के लसीकरण करून ही मोहीम पुढे न्यावी. सार्वजनिक उपक्रमाला बंदी घातली तरीही काही नागरिक लस घेण्यास तयार नाहीत, त्यांना प्रवृत्त करा. त्यांचे गैरसमज दूर करा. पहिला आणि दुसरा डोस न घेतलेल्या अशा साडेसात लाख नागरिकांच्या याद्या ग्रामसेवक यांच्याकडे आहेत. यादीतील नागरिकांना संपर्क साधून प्रवृत्त करावे.
डॉ वनेरकर यांनी सांगितले की, दोन डोस घेतले आणि कोरोना झाला तर घाबरू नका, सौम्य लक्षण असल्याने उपचाराने कोरोना रुग्ण बरा होतोय. यामध्ये लस घेतल्याने ऑक्सिजनची गरज पडली नाही, म्हणून जास्तीत जास्त लसीकरण करून घेणे गरजेचे आहे.
डॉ सरवदे यांनी सांगितले की, गटांनी संवाद कौशल्याचा वापर करून लसीकरणसाठी नागरिकांना प्रवृत्त करावे. आशा आणि उमेदच्या महिलांनी हातात हात घालून काम करावे. लसीचे फायदे काय ते सांगावे.
यावेळी अनेक गट प्रेरिकेने आपली मते सांगून अडचणी मांडल्या. जिल्हाधिकारी श्री शंभरकर आणि श्री स्वामी यांनी अडचणीबाबत त्यांना आश्वस्त केले.