राज्य

रुग्ण वाढू लागले ,पंढरपुरात ६५ एकर येथे ३०० बेडचे कोविड केअर सेंटर सुरु

पंढरपूर, दि.17 :-  तालुक्यात शहरासह ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या रुग्णांना वेळेत उपचार व आवश्यक त्या वैद्यकीय सुविधा मिळाव्यात यासाठी 65 एकर येथील एमटीडीसीच्या इमारतीमध्ये 300  बेडचे शासकीय कोविड केअर सेंटर पुन्हा सुरु करण्यात आले असल्याची माहिती प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी दिली.

            कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी  65 एकर  येथील  एमटीडीसीच्या इमारतीमध्ये कोविड केअर सेंटर  पुन्हा करण्यात आले आहे. या कोविड केअर सेंटर येथील सोयी-सुविधांची पाहणी प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी केली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, तहसीलदार सुशिल बेल्हेकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एकनाथ बोधले, उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर, बांधकाम विभागाचे अभियंता श्री.पाटील, डॉ.जानकर तसेच वैद्यकीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

            यावेळी प्रांताधिकारी गुरव म्हणाले, कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा संसर्ग वाढू नये यासाठी प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तसेच  कोरोना बाधित रुग्णांना वेळेत व योग्य  उपचार मिळावेत यासाठी 65 एकर येथे शासकीय कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहे.या ठिकाणी  रुग्णांनसाठी  मुबलक प्रमाणात औषधसाठा, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, योग्य आहार व स्वच्छता राहिल याबाबत आरोग्य विभाग व नगरपालिका प्रशासनानी दक्षता घ्यावी. तसेच उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर येथे  इतर आजारांच्या रुग्णांवरील उपचाराबरोबरच कोविड हॉस्पिटल सुरु असून, याठिकाणी ऑक्सिजन प्लॅन्टही कार्यान्वित करण्यात आला आहे.  रुग्णांना उपचारा दरम्यान ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही याचीही  दक्षता आरोग्य विभागाने  घ्यावी  अशा सूचना प्रांताधिकारी गुरव यांनी यावेळी दिल्या.

        तालुक्यात  रुग्णांच्या वाढती संख्या लक्षात घेता खाजगी  कोविड हॉस्पिटलने  गरीब व गरजू रुग्णांच्या उपचारासाठी महात्मा फुले जन आरोग्य योजनेतंर्गत असणारे बेड उपलब्ध ठेवावे नागरिकांनी सर्दी, ताप, खोकला आदी आजाराची लक्षणे आढल्यास तात्काळ आरोग्य तपासणी करुन घ्यावी. तसेच ज्या नागरिकांनी लसिकरण केले नाही त्यांनी तात्काळ लसीकरण करुन घ्यावे असे,,आवाहनही प्रांताधिकारी गुरव यांनी केले. यावेळी कोविड केअर सेंटर येथे उपचार घेत असलेल्या रुग्णांची चौकशी करुन. देण्यात येणारे औषधोपचार व इतर सुविधेबाबतची माहिती घेतली.

              तालुक्यात सद्यस्थितीत शहरात 105 तर ग्रामीणमध्ये 70 असे एकूण 175  कोरोना बाधित रुग्ण उपचार घेत असून, गेल्या काही दिवसांमध्ये रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. नागरिकांनी कोरोना संसर्गाच्या बचावासाठी मास्क, सॅनिटायझर  वापर, सामाजिक अंतर व  स्वच्छता या बाबीचे पालन करावे असे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले यांनी सांगितले.

           पंढरपूर तालुक्यात पहिला डोस 81 टक्के नागरिकांनी घेतला आहे तर दुसरा डोस 50 टक्के नागरिकांनी घेतला आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित राहण्यासाठी राहिलेल्या नागरिकांनी त्वरित लसीकरण करून घ्यावे असे आवाहन तहसीलदार बेल्हेकर यांनी केले आहे.

Header

Related Articles

Back to top button
Close
Close