पंढरपुरात समाधान आणि अभिमान वाटावं अस काम व्हावे : विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली अपेक्षा
पंढरपूर,दि.18: पंढरपूर शहरात वारीनिमित्त लाखो भाविक येतात. वारकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात सुविधा देण्यात येत आहेत. येत्या एक-दोन वर्षात यामध्ये सुधारणा होऊन दर्शन रांगेसाठी स्कायवॉक, पद्मावती उद्यान, यमाई तलाव, 65 एकर परिसर याठिकाणी सुधारणा होत आहेत. शहरात चांगल काम होत आहे, खूप प्रगती होत आहे, बऱ्याच विषयांवर मार्ग निघत आहे, यामुळे पंढरपूरला गेल्यावर समाधान आणि अभिमान वाटावे, असे काम होणे अपेक्षित असल्याची भावना विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली.
पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आढावा आणि इतर कामे याबाबत ऑनलाईन बैठकीतदरम्यान श्रीमती गोऱ्हे बोलत होत्या. ऑनलाइन बैठकीला सोलापुरातून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पंढरपूरचे प्रांताधिकारी तथा मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव, नगरपालिकेचे मुख्याधिकारी अरविंद माळी यांच्यासह मुंबईहून उपसचिव सतीश मोघे, सुनील उंबरे उपस्थित होते.
श्रीमती गोऱ्हे यांनी सांगितले की, पंढरपूर शहरात वर्षभर वारकरी, भाविक मोठ्या प्रमाणात येतात. तसेच आषाढी, कार्तिक, माघी व चैत्री या यात्रा कालावधीत मोठ्या प्रमाणात भाविक येत असल्याने भाविकांची गैरसोय होणार नाही यासाठी नगरपालिका प्रशासन व मंदिर समितीने आवश्यकती कामे तत्काळ करावीत. मंदिर समिती मार्फत बांधण्यात येणाऱ्या दर्शन मंडप व स्काय वॉक भाविकांना आवश्यक सुविधेसह उपलब्ध करून द्या. यासाठी स्वच्छतागृहे, सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक यंत्रणा आदी सुविधांचा समावेश करावा. याबाबत महाराज मंडळी, भाविक यांच्या सूचनांचाही विचारा करावा. शेगावमधील आनंद सागर उद्यानाच्या धर्तीवर उद्यान उभारणीसाठी तत्काळ जागेची निश्चिती करुन नगरपालिकेने प्रस्ताव सादर करावा. पंढरपूर नगरपालिकेने पद्मावती उद्यान दुरुस्तीसाठी स्थानिक लोकप्रतिनिधींशी चर्चा करून दुरुस्तीची कार्यवाही करावी अथवा अर्बन फॉरेस्ट अंतर्गत उद्यानाची उभारणी करावी. स्वच्छता कर्मचारी यांचा गृहबांधणीचा प्रश्न तत्काळ मार्गी लावावा, असे निर्देशही श्रीमती गोऱ्हे यांनी यावेळी दिले.
वारी कालावधीत मोठ्या प्रमाणात पंढरपूरात भाविक येत असतात आषाढी यात्रेमध्ये सुमारे 10 ते 12 लाख भाविक पंढरपुरात येतात. येणाऱ्या भाविकांना प्रशासनामार्फत आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येतात. भाविकांसाठी 28 हजार स्वच्छतागृहे उपलब्ध करण्यात आलेले आहेत. यामध्ये मठ, सुलभ शौचालय, धर्मशाळा, आदींचा समावेश आहे. वारी कालावधीत 65 एकर येथेही भाविकांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात. अपूर्ण असलेल्या आमदार निधीतून बांधण्यात आलेले अपूर्ण यात्री निवासाचे काम तत्काळ मार्गी लावण्यासाठी निधीची उपलब्धता करून बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल. वारी कालावधीत बंदोबस्तासाठी येणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचारी यांची राहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गैरसोय होते. या निवासाचा उपयोग त्यांना उपयोग होईल. पंढरपुरातील स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या घरबांधणीसाठी तत्काळ बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले.
नमामी चंद्रभागा अभियानांतर्गत लगतच्या विविध गावात जनजागृतीचे उपक्रम राबविण्यात आले असून त्यामध्ये चंद्रभागा स्वच्छतेबाबतचे महत्व पटवून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली असल्याचे श्री स्वामी यांनी सांगितले.
मंदिराला मूळ रूप देण्यासाठी पुरातत्व विभागाकडून पाहणी करून डीपीआर तयार करण्यात आला आहे. तसेच नव्याने प्रस्तावित असलेल्या दर्शनमंडप व स्काय वॉक मध्ये वारकऱ्यांच्या व भाविकांच्या आवश्यक सुविधांचा विचार करून स्वच्छतेच्या व सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे. याचा खर्च मंदिर समिती तसेच भाविकाच्या देणगी स्वरूपाच्या निधीतून करण्यात येणार असल्याचे कार्यकारी अधिकारी श्री गुरव यांनी सांगितले.
पंढरपूर नगरपालिकेच्या वतीने नामसंकीर्तन सभागृह उभारण्यात येत असून, या सभागृहाच्या उभारणीसाठी दहा कोटीचा निधी शासनाकडून प्राप्त झाला असून उर्वरित 16.92 कोटी रुपयांचा निधीचा मागणीचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. तसेच गोपाळपूर ग्रामपंचायत हद्दीतील असलेली 17 हेक्टर नगरपालिकेच्या मालकीच्या जागेबाबत लोकप्रतिनिधींशी बैठक घेऊन पर्यटनस्थळ विकासासाठी प्रस्ताव सादर करण्यात येईल. स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या गृहबांधणीसाठी गुजराती चाळी येथेच नवीन इमारत उभारणी किंवा नगरपालिकेच्या पंतप्रधान आवास योजनेतून घरे उपलब्ध करून देण्यात येतील, असे श्री माळी यांनी सांगितले