ऊस गाळपात सोलापूर विभाग राज्यात अग्रेसर; अद्यापही दहा कारखाने सुरूच
पंढरपूर– राज्यातील साखर कारखान्यांचा 2021-22 चा गळीत हंगाम विक्रमी झाला असून 1 हजार 304 लाख मे. टन उसाचे गाळप आतापर्यंत झाले आहे. यात सर्वात आघाडीवर सोलापूर जिल्हा असून येथे 298.74 लाख टन ऊस गाळला गेला आहे. अद्याप ही दहा कारखाने सुरूच आहेत.
राज्यात या हंगामात 101 सहकारी तर 99 खासगी साखर कारखाने गळीत हंगामात उतरले होते. यापैकी आता 132 कारखान्यांनी आपला गळीत हंगाम आटोपता घेतला असून 68 कारखाने सुरू आहेत. राज्यात 18 मे अखेर 1304 लाख टन उसाचे गाळप होवून 135.78 लाख टन साखर तयार झाली आहे. हा आजवरच विक्रम आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा हा 10.41 टक्के इतका आहे.
सोलापूर जिल्ह्यात 47 कारखाने गळीतात उतरले होते यापैकी 37 कारखाने बंद झाले असून दहा अद्याप सुरू आहेेत. येथे 398.74 लाख टन ऊस गाळप झाला असून 28.23 लाख टन साखर तयार झाली आहे. जिल्ह्याचा सरासरी साखर उतारा हा 9.45 टक्के इतका आहे. सर्वात जास्त उतारा कोल्हापूर विभागात 11.80 टक्के इतका मिळाला असून तेथे 254 लाख टन ऊस गाळप होवून 30 लाख टन साखर तयार झाली आहे. तेथील सर्व 36 कारखाने बंद झाले आहेत. पुणे विभागातील 30 पैकी 4 कारखाने सध्या सुरू आहेत. या विभागात 269 लाख टन ऊस गाळप होवून 29 लाख टन साखर तयार झाली आहे. येथील साखर उतारा हा 10.78 टक्के इतका आहे.
अहमदनगर विभागात 28 पैकी 14 कारखाने सुरू असून तेथे दहा टक्के साखर उतार्याने 196 लाख टन ऊस गाळप होवून 19.6 लाख टन साखर तयार झाली आहे. नांदेड विभागात 27 पैकी दहा कारखाने बंद असून तेथे 144 लाख टन ऊस गाळप झाला असून 10.41 टक्के साखर उतार्याने 15 लाख टन साखर तयार झाली आहे. औरंगाबाद विभागात 25 पैकी वीस कारखाने सुरू असून तेथे 127 लाख टन ऊस गाळप होवून 12.4 लाख टन साखर 9.80 टक्के साखर उतार्याने तयार झाली आहे.
अमरावती विभागात सहा पैकी दोन कारखाने बंद झाले असून तेथे दहा लाख टन उसाचे गाळप होवून 96 हजार टन साखर 9.65 टक्के साखर उतार्याने तयार झाली आहे. नागपूर विभागात चार पैकी दोन कारखाने सुरू असून 4.48 लाख टन ऊस गाळप होवून 38 हजार टन साखर तयार झाली आहे.
यंदा राज्यात गतवर्षीपेक्षा तीनशे लाख टन जास्त उसाचे गाळप झाले आहे. गतवर्षी एकूण 190 कारखाने गाळपात उतरले होते व त्यांनी 1013 टन ऊस गाळप करून 106.38 लाख टन साखर 10.50 टक्के साखर उतार्याने तयार केली होती.