विशेष

आषाढीला सरगम चौकात मानाच्या पालख्या रेल्वे रूळावरून जाणार !
जिल्हाधिकारी, रेल्वे अधिकारी, संस्थान प्रमुख यांच्या बैठकीत तोडगा


सोलापूर, दि.19 : वारकरी प्रथा, परंपरेनुसार 10 मानाच्या पालख्या सरगम चौकातील रेल्वे रूळावरूनच जाणार आहेत. याबाबत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, रेल्वेचे अधिकारी विभागीय विद्युत अभियंता पराग आकनूरवार, विभागीय वित्तीय व्यवस्थापक प्रदीप हिरडे, विभागीय ऑपरेशन व्यवस्थापक एल.के. रानयेवले आणि पालखी संस्थानचे प्रतिनिधी यांच्यामध्ये चर्चेतून तोडगा निघाला आहे.

पंढरपूरला वारी करण्याची खूप वर्षांची प्रथा आहे. यानुसार वारीला मानाच्या 7 पालख्या येतात, यात आणखी तीनची भर पडली आहे. मानाच्या 10 पालख्यांची उंची 12 फुटांपेक्षा जास्त आहे. यामुळे सरगम चौकातील रेल्वे पुलाच्या खालून जाता येत नसल्याने रेल्वे रूळावरून पालख्या जात होत्या. ही परंपरा खूप वर्षांची आहे. मात्र रेल्वेने यंदा रेल्वेचे विद्युतीकरण केल्याने 5.80 मीटर उंचीवरून हाय व्होल्टेज वायर जात असल्याने यामुळे काही धोका निर्माण होऊ नये, यासाठी यावर तोडगा काढण्यासाठी नियोजन भवन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

जिल्हाधिकारी श्री. शंभरकर यांनी सांगितले की, कोरोनाचे निर्बंध हटविल्याने वारीचा उत्साह मोठा आहे. यामुळे यंदा 15 लाख भाविक येण्याची शक्यता आहे. वारकरी संप्रदाय, प्रथा-परंपरा यांना महत्व आहे. मानाच्या पालख्यांचा मार्ग बदलणे योग्य ठरणार नाही. रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांनी वारकरी परंपरेचा मान राखून पर्याय सूचवावे. वारकरी संस्थानांना विनंती की त्यांनी आपापले रथ, पालखी कमीत कमी वेळेत रेल्वे रूळ पार करावा. रथ किंवा पालखी वरून गेली तर इतर वारकऱ्यांनी पुलाच्या खालून जावे. मानाच्या पालख्या सोडून इतर पालख्या रेल्वे रूळाखालून किंवा इतर मार्गाने नेण्यात याव्यात, असे आवाहनही त्यांनी केले.

विभागीय विद्युत अभियंता श्री.आकनूरवार यांनी सांगितले की, रेल्वेची भूमिका प्रथा-परंपरेनुसार सामजस्याची राहील. कुर्डूवाडी ते सांगोला विद्युत पुरवठा स्थगित करावा लागेल किंवा पालख्या जाईपर्यंत विद्युत तार हटवावी लागेल. दुसरा पर्याय वारी कालावधीत रेल्वे विद्युत इंजिनऐवजी डिझेल इंजिनचा राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रांताधिकारी तथा विठ्ठल-रूक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांनी 10 मानाच्या पालख्यांची माहिती दिली. संत तुकाराम महाराज रथाची उंची सर्वात जास्त 20 फूट आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान, श्रीक्षेत्र आळंदी (रथाची उंची 15 फूट), श्री संत तुकाराम महाराज संस्थान, श्रीक्षेत्र देहू (रथाची उंची 20 फूट), श्री संत सोपानदेव समाधी मंदिर ट्रस्ट, श्रीक्षेत्र सासवड (रथाची उंची 14 फूट), श्री संत निवृत्तीनाथ समाधी संस्थान, श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर (रथाची उंची 12 फूट), श्री संत मुक्ताई देवस्थान, मुक्ताईनगर (रथाची उंची-15 फूट), श्री संत एकनाथ महाराज देवस्थान संस्थान, श्रीक्षेत्र पैठण (रथाची उंची-14 फूट), श्री नामदेव महाराज संस्थान, श्रीक्षेत्र पंढरपूर (रथाची उंची 14 फूट), श्री चांगावटेश्वर देवस्थान, सासवड (रथाची उंची 14 फूट), विठ्ठल-रूख्माई संस्थान कौंडण्यपूर (रथ नाही, वाहनातून पालखी) आणि श्री संत निळोबाराय संस्थान, पिंपळनेर (रथाची उंची 12 फूट) यापद्धतीने रथांची उंची आहे.

बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, संत सोपानदेव पालखी संस्थानचे मनोज रणवरे, संत मुक्ताबाई संस्थानचे शशिकांत पाटील, ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे पुरूषोत्तम उत्पात, सोपानदेव समाधी संस्थानचे सिद्धेश शिंदे, चांगावटेश्वर संस्थानचे अरूण दरेकर, शशिकांत जगताप आदी उपस्थित होते.

Header

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close